डिक्कीतील ऐवज चोरुन तो बनला लखपती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 09:35 PM2019-03-16T21:35:49+5:302019-03-16T21:38:27+5:30
पार्किंग केलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून रोख, मौल्यवान ऐवज चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट ४ ला यश आले आहे.
पुणे : पार्किंग केलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून रोख, मौल्यवान ऐवज चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट ४ ला यश आले आहे. विशेष म्हणजे तो डिक्कीचे कुलूप न तोडता वरील प्लॉस्टीकचे शिट ताकदीने उचकटून त्यातून हात घालून हाताला लागेल ती वस्तू चोरुन नेत असे त्यांच्याकडून १२ गुन्हे उघडकीस आले असून साडेचार लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
सुभाष ऊर्फ बाबा लक्ष्मण बनपट्टे (वय ४०, रा़ वडारवाडी) असे त्याचे नाव आहे. याबाबतची माहिती सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी दिली़. तीन आठवड्यापूर्वी नाना पेठेतील इमारतीच्या पार्किंगमधून दुचाकीची डिक्की उचकटून पैसे चोरीला गेले होते़ त्या ठिकाणच्या सीसीटीव्हीमध्ये आरोपी कैद झाला होता. गुन्हे शाखेच्या युनिट ४ चे कर्मचारी रमेश चौधर, निलेश शिवतरे यांना सराईत गुन्हेगार बनपट्टे याने ही चोरी केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वडारवाडी भागात पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले. त्याच्याकडे तपास करता त्याने यापूर्वी बरेच गुन्हे केल्याचे व त्यातून जामीनावर सुटल्यानंतर पुणे शहरात अनेक ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून १२ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. त्याच्याकडून लॅपटॉपसह ४ लाख २७ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, सहायक निरीक्षक अश्विनी जगताप, उपनिरीक्षक विजय झंझाड, कर्मचारी शंकर संपते, रमेश साबळे, गणेश साळुंके, अतुल मेंगे, शितल शिंदे, सचिन ढवळे, रमेश चौधर आदिंनी ही कामगिरी केली़.
ऐवज चोरीला गेला आहे, अशांनी पोलिसांशी संपर्क साधावा
बनपट्टे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीचे १० गुन्हे दाखल आहेत. तो २०१५ मध्ये कारागृहातून बाहेर आला आहे. तेव्हापासून तो चोऱ्या करत आहे. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. ज्यांचे दुचाकीचे डिक्कीची चावी न लावताऐवज चोरीला गेला आहे, अशांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी केले आहे.
चोऱ्यातून तो करत होता बचत
बनपट्टे याचे दोन विवाह झाले असले तरी दोन्ही पत्नी त्याच्याजवळ रहात नाही़त. तो केवळ मोपेड त्यातही काही ठराविक दुचाकींचे डिक्कीतून वस्तू चोरत असे. चोरलेल्या पैशांतून काही पैसे तो खाण्यापिण्यासाठी खर्च करीत असत. काही पैसे तो व्याजाने देत असत. त्याला इतर कोणतेही व्यसन नसल्याने उरलेल्या पैशांची तो बचत करीत असे. त्याची दोन बँकांमध्ये खाती असून त्यातील एका खात्यातील ४ लाख रुपये पोलिसांनी हस्तगत केले आहेत.