स्टॉल लिलावावरून नगरसेवकांत तू, तू-मैं-मैं
By admin | Published: March 6, 2016 01:12 AM2016-03-06T01:12:03+5:302016-03-06T01:12:03+5:30
दौंड नगर परिषदेने बांधलेल्या स्टॉलच्या लिलावाच्या प्रश्नावर दौंड नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांत गरमागरम चर्चा झाली
दौंड : दौंड नगर परिषदेने बांधलेल्या स्टॉलच्या लिलावाच्या प्रश्नावर दौंड नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांत गरमागरम चर्चा झाली. गाळ्यांचे लिलाव जाहीर पद्धतीने करण्यात यावेत, अशी भूमिका काहींनी घेतली, तर लिलाव करताना सर्वसामान्यांचाही विचार व्हावा, अशी भूमिका काही नगरसेवकांनी घेतली.
दौंडच्या आठवडेबाजाराजवळील नव्याने बांधलेली चिकन व मटण दुकाने तसेच दैनंदिन मंडईमध्ये नव्याने बांधलेले ओटे जाहीर लिलाव करून देण्यात यावेत, असा प्रस्ताव मांडल्यानंतर नगरसेवक बादशहा शेख म्हणाले, की लिलाव पद्धतीने आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले लोक हे स्टॉल घेतील; मात्र ज्यांनी आयुष्य भाजीपाला विक्रीमध्ये घालवले त्यांना तुम्ही काय देणार? यामुळे गोरगरिबांचा विचार करून त्यांना गाळे द्यावेत, अशी भूमिका त्यांनी घेतली. यावर मुख्याधिकारी शिवाजी कापरे म्हणाले, की नियमानुसार लिलावाद्वारेच स्टॉलची विक्री केली जाईल. एखाद्या माणसाने स्टॉल घेतला आणि त्यात पोटभाडेकरू घातला, तर त्याच्याकडून नियमाने पुन्हा स्टॉल परत घेण्याचा अधिकार नगर परिषदेला आहे.
यावर नगरसेवक प्रेमसुख कटारिया म्हणाले, की बादशहा शेख यांनी योग्य मत मांडले; परंतु जे काही करायचे ते कायद्यानेच झाले पाहिजे. गुरुमुख नारंग म्हणाले, की गावात मटण आणि चिकन यांची दुकाने किती आहेत त्याची आकडेवारी द्या. परंतु, आकडेवारी पाहण्यातच वेळ गेल्याचे नगरसेवक राजू बारवकर म्हणाले. अंदाजे आकडा सांगा, असे म्हणताच गुरुमुख नारंग म्हणाले, अंदाजपंचे आकडेवारी देण्यासाठी हा काय खेळ आहे का?
नगराध्यक्षा अंकुशाबाई शिंदे म्हणाल्या, ‘‘सभागृहाचा वेळ वाया घालवू नका. विषयपत्रिका आधीच मिळते. विषयपत्रिकेचा अभ्यास करून त्यानुसार सुरुवातीलाच माहिती मागवली पाहिजे’’ यावर गुरुमुख नारंग आणि अनिल साळवे म्हणाले, की माहितीच मिळत नाही; त्यामुळे माहिती मागविण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र, हे लिलाव करताना नगर परिषदेने पारदर्शकता ठेवली पाहिजे.
नगरसेविका शीतल मोरे, नगरसेविका आकांक्षा काळे यांनी सामाजिक बांधिलकीतून प्रश्न उपस्थित केले. या विषयासह अन्य काही विषयांवर चर्चा करण्यात आली.