VIDEO : कोयता गँगकडून तुळशीबागेतील स्टॉलची तोडफोड; तपकीर गल्लीतील मोबाईल मार्केटमध्येही राडा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 12:09 AM2023-01-10T00:09:46+5:302023-01-10T00:11:09+5:30

उपनगरात अनेकदा कोयता गँग तोडफोड करुन दहशत माजवत आहेत. सिंहगड रोड पोलिसांनी त्यांच्यातील एकाला पकडून चांगला चोप दिला होता.

Stall vandalized in Tulshibagh and mobile market in Tapkir Galli by Koyta Gang | VIDEO : कोयता गँगकडून तुळशीबागेतील स्टॉलची तोडफोड; तपकीर गल्लीतील मोबाईल मार्केटमध्येही राडा

VIDEO : कोयता गँगकडून तुळशीबागेतील स्टॉलची तोडफोड; तपकीर गल्लीतील मोबाईल मार्केटमध्येही राडा

Next

पुणे : उपनगरांत कोयता गँगची दहशत असतानाच, आता वसंत टॉकीज समोरील तपकीर गल्ली आणि तुळशीबागेतही टोळभैरवांनी दहशत माजवून स्टॉलची तोडफोड केल्याची घटना  घडली आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पाटील इस्टेट येथील दोघा अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, या घटनेमुळे मोबाईल मार्केट आणि तुळशीबागेतील व्यावसायिकांमध्ये घबराट पसरली आहे.

उपनगरात अनेकदा कोयता गँग तोडफोड करुन दहशत माजवत आहेत. सिंहगड रोड पोलिसांनी त्यांच्यातील एकाला पकडून चांगला चोप दिला होता. त्या पोलीस कर्मचार्यांचे नागरिकांनी कौतुक केले. पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनीही त्यांचा सत्कार केला. असे असताना हे दहशतीचे लोण आता मध्य वस्तीत पसरल्याचे दिसून येत आहे.


वसंत टॉकीज समोरील तपकीर गल्ली ही मोबाईल मार्केट म्हणून प्रसिद्ध आहे. या गल्लीत सोमवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. त्यावेळी हातात कोयते, बांबू घेतलेले तोडाला रुमाल बांधलेले चौघे जण गल्लीत आले. ते एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत गेले. परंतु, गर्दीमध्ये कोणाच्या लक्षात आले नाही. त्यानंतर त्यांनी शिवीगाळ करीत तेथील मोबाईल दुकानावर हातातील कोयते, बांबुने सपासप वार करुन तोडफोड करण्यास सुरुवात केली. 

यानंतर, लोकांची एकच पळापळ सुरु झाली. त्यांनी दुकानासमोरील काऊंटरवर लाथा मारुन त्यावरील सामानाची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दुकानदारांनी पटापट दुकानांची शटर ओढून घेतली.


यानंतर या टोळ भैरवांनी आपला मोर्चा तुळशीबागेकडे वळविला. चौघांपैकी तिघे जण बाजीराव रस्त्यावरील बँक ऑफ महाराष्ट्रासमोरुन आत गल्लीत शिरले. तेव्हा त्यांच्या हातात लाकडाचे वासे होते. ते संपूर्ण गल्लीतून चालत राम मंदिर ओलांडून सरळ तुळशीबागेत दुसर्या टोकाकडील बाबु गेनू चौकापर्यंत आले. गल्लीच्या तोंडावर असलेल्या एक -दोन स्टॉलवर त्यांनी हातातील वासे मारुन सामानाची तोडफोड केली. तेथून पुन्हा उलट येथून राम मंदिरासमोरील स्टॉलची मोडतोड केली. तेथून ते तुळशीबाग गणपती समोर येऊन पळत कावरे कोल्डिंगपर्यंत गेले. जवळपास ५ स्टॉलवर त्यांनी तोडफोड केली. हा प्रकार सुरु झाल्याने एकच आरडाओरडा होऊन लोकांची पळापळ सुरु झाली. सुरुवातीला लोकांना काय होतेय हे समजले नाही. तेथील दोघा व्यावसायिकांनी त्यांचा पाठलाग सुरु केला. त्यातील एकाला कावरे कोल्डिंगजवळ पकडले. काही वेळातच पोलीस आल्यावर त्यांच्या ताब्यात त्याला देण्यात आले.

याबाबत फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी सांगितले की, विश्रामबाग पोलीस व नागरिकांच्या मदतीने दोघांना पकडण्यात आले आहे. तपकीर गल्लीतील अनेक दुकानांचे नुकसान झाले आहे. दोघेही अल्पवयीन असून पाटील इस्टेट येथे राहणारे आहेत. भाईगिरी करण्यासाठी दहशत पसरविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांच्या दोघा साथीदारांचा शोध सुरु आहे. फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

Web Title: Stall vandalized in Tulshibagh and mobile market in Tapkir Galli by Koyta Gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.