पुढील आर्थिक वर्षापर्यंत मुद्रांक शुल्कात सवलत द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:11 AM2021-04-09T04:11:44+5:302021-04-09T04:11:44+5:30

बांधकाम क्षेत्राशी संलग्न सेवांना निर्बंधांमधून सूट हवी पुणे : गेल्या वर्षभराच्या काळात कोरोना महामारीमुळे बांधकाम क्षेत्राला जोरदार फटका बसला. ...

Stamp duty should be reduced till the next financial year | पुढील आर्थिक वर्षापर्यंत मुद्रांक शुल्कात सवलत द्यावी

पुढील आर्थिक वर्षापर्यंत मुद्रांक शुल्कात सवलत द्यावी

Next

बांधकाम क्षेत्राशी संलग्न सेवांना निर्बंधांमधून सूट हवी

पुणे : गेल्या वर्षभराच्या काळात कोरोना महामारीमुळे बांधकाम क्षेत्राला जोरदार फटका बसला. यातून बांधकाम क्षेत्र कसेबसे सावरत असतानाच आता पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट राज्यावर ओढवले. ही परिस्थिती लक्षात घेऊन, राज्य सरकारने बांधकाम क्षेत्रासाठी आकारण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्कात पुढील आर्थिक वर्षापर्यंत सवलत द्यावी, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष सुनील फुरडे यांनी पत्राद्वारे केली.

तसेच राज्यात सध्या लागू असलेल्या निर्बंधांमधून बांधकाम क्षेत्राशी संलग्न सेवांना कोरोना प्रतिबंधक नियम पाळत ५०% क्षमतेने काम करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती देखील केली आहे.

फुरडे म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात बांधकाम क्षेत्राला पुन्हा उभारी मिळावी, या दृष्टीने क्रेडाई महाराष्ट्रने नवीन घरखरेदीवर मुद्रांक शुल्कात कपात करण्यासंदर्भातील काही उपाययोजना सरकारला सुचविल्या होत्या. या उपाययोजना सरकारने देखील मान्य केल्याने नवीन घरे खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी या सवलतीचा फायदा करून घेत उत्साहाने घर खरेदीला प्राधान्य दिले. मात्र, मुद्रांक शुल्कात असलेली ही सूट मार्चअखेरीस संपुष्टात आली. ती पुन्हा लागू करण्यासंदर्भात सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा थेट परिणाम बांधकाम क्षेत्रावर अल्पावधीतच दिसू शकतो. म्हणूनच या परिस्थितीतून तग धरण्यासाठी सरकारने पुढील वर्षापर्यंत मुद्रांक शुल्कात सवलत द्यावी, यामुळे गृहविक्री व नोंदणी यांमध्ये देखील वाढ होऊन सरकारी मिळकतीवरही याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल.’’

याबरोबरच मजुरांचे स्थलांतर, बांधकामाचे वाढलेले शुल्क, गृहखरेदीदारांचा घर खरेदीबद्दल असलेला निरुत्साह याचा फटका बांधकाम क्षेत्राला बसत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने बांधकाम क्षेत्राबरोबरच त्याच्याशी संबंधित २५० उद्योग आणि लाखो कुशल व अकुशल कामगारांच्या हिताचे निर्णय घ्यावेत.

सनदी लेखापालांप्रमाणेच वास्तुविशारद, स्ट्रक्चरल अभियंते यांची कार्यालये देखील कोरोना प्रतिबंधाच्या सर्व नियमांचे पालन करून ५० % क्षमतेने सुरु करण्याची परवानगी सरकारने द्यावी. सिमेंट, स्टील, हार्डवेअर यांचा पुरवठा करणा-या दुकानांना किमान ४ ते ५ तासाची मुभा द्यावी, अशा अनेक महत्वपूर्ण व्यवसायांवर घालण्यात आलेल्या निर्बंधांवर सरकारने पुनर्विचार करावा, अशीही मागणी केली.

-----------

मजुरांना ये-जा करण्यासाठी निर्बंध नसावेत

काही लहान शहरांमध्ये स्थानिक बांधकाम मजूर हे बांधकामाच्या ठिकाणी न राहता आपापल्या घरीच किंवा आसपासच्या परिसरात राहत असतात हे लक्षात घेत या मजुरांच्या येण्या जाण्यावर निर्बंध नसावेत. जर काम पुरविण्यात आले नाही, तर हे परराज्यातील मजूर आपापल्या राज्यात पुन्हा परतण्याची शक्यता नाकारता येत नाही, हे लक्षात घेत संबंधित विभागाला तशा सूचना दिल्या जाव्यात,असे क्रेडाई महाराष्ट्रद्वारे मागणी केली.

………………….

Web Title: Stamp duty should be reduced till the next financial year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.