लोकसाहित्य समितीचे अस्तित्वच संपुष्टात: साहित्यवर्तुळातून उमटला नाराजीचा सूर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 06:00 AM2019-02-20T06:00:00+5:302019-02-20T06:00:04+5:30
राज्याच्या संस्कृतीची ओळख ही ख-या अर्थाने लोकसाहित्यातून होते. त्यामुळेच मराठमोळया प्रांतातील लोकसाहित्याचे संशोधन, जतन, संकलन योग्य पद्धतीने व्हावे...
- नम्रता फडणीस-
पुणे : लोकसाहित्याचे संशोधन, जतन करण्याबरोबरच लोकसाहित्याचा प्रसार करणे या उददेशाने स्थापन करण्यात आलेल्या ह्यलोकसाहित्य समितीह्ण वर तीन वर्षांपूर्वी माजी संमेलनाध्यक्ष फ.मु शिंदे यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली खरी; मात्र हे पद आणि समिती राहिली ती केवळ कागदावरच. ना कोणती बैठक ना कोणते कामकाज झाले. आपल्या अध्यक्षपदाची मुदत संपली आहे की नाही हे देखील फ.मु शिंदे यांना माहिती नाही ही तर अजूनच धक्कादायक बाब आहे...2017 लाच समितीची मुदत संपली आहे. मात्र दोन वर्षात समितीची स्थापना करण्यास शासनाला मुहूर्त गवसलेला नसल्यामुळे समितीचे अस्तित्वच संपुष्टात आले आहे. लोकसाहित्य समितीचे अध्यक्षपद भूषविलेल्या सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दी वर्षास यावषीर्पासून प्रारंभ झाला आहे. लोकसाहित्यासाठी आयुष्य वेचलेल्या बाबर यांच्या जन्मशताब्दी काळात या समितीचे कामकाज बंद होणे यासारखी दुसरी शोकांतिका नसल्याचा सूर साहित्यवतुर्ळातून उमटत आहे.
राज्याच्या संस्कृतीची ओळख ही ख-या अर्थाने लोकसाहित्यातून होते. त्यामुळेच मराठमोळया प्रांतातील लोकसाहित्याचे संशोधन, जतन, संकलन योग्य पद्धतीने व्हावे. लोकसाहित्याचे प्रकाशन व्हावे याकरिता तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी ह्यलोकसाहित्य समितीह्णची स्थापना केली होती. त्या समितीचे चि.गं कर्वे हे पहिले अध्यक्ष होते. त्यानंतर लोकसाहित्याच्या अभ्यासक, संशोधिका, लेखिका डॉ. सरोजिनी बाबर यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्या काळात बाबर यांनी मोठ्या प्रमाणावर ग्रंथसंपदा निर्माण करून लोकसाहित्य वाचकांपर्यंत पोहोचविले. लोकगीतांचे दस्तावेजीकरण केले. त्यानंतर द.ता भोसले यांच्याकडे अध्यक्षपद आले. मात्र तेही समितीच्या कामकाजाबाबत फारसे समाधानी नव्हते. त्यानंतरच्या काळात डॉ. केशव फाळके समितीचे अध्यक्ष होऊनही त्यांना निधीअभावी फारसे काम करता आले नाही. सरकारने या समितीची पुनर्रचना करून माजी संमेलनाध्यक्ष प्रा. फ. मुं. शिंदे यांच्याकडे समितीचे अध्यक्षपद सोपविले. मात्र समितीने पुढाकार घेऊन कोणतेच काम केले नाही ना समितीच्या बैठका झाल्या. या समितीचा कार्यकाळ 2017 रोजीच संपुष्टात आला आहे. तरीही अद्याप समिती स्थापन करण्यात आलेली नाही. गेल्या दोन वर्षांपासून ही समितीच अस्तित्वात नसल्याचे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले. याला लोकसाहित्याच्या अभ्यासकांनीही दुजोरा दिला आहे. शिक्षण उपसंचालक हे समितीचे पदसिद्ध सचिव असतात.मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्याशी संपर्क साधूनही कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.
...................
दोन वर्षांपासून समितीच्या स्थापनेस शासनाला मुहूर्तच गवसला नाही
लोकसाहित्याचे जतन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीवर मी कार्यरत होतो. 2012 ते 2014 आणि नंतर 2015 ते 2017 दरम्यान समिती कार्यरत होती. डॉ. केशव फाळके यांच्या कार्यकाळात एकदोन बैठका झाल्या. त्यांना खूप संघर्ष करावा लागला. मात्र फ.मु शिंदे च्या काळात कोणतेच कामकाज झाले नाही. आमच्या अनुक्रमे दोन टर्म वाया गेल्या. 2017 मध्ये आमची मुदत संपली. मात्र या सरकारने ही समिती पुन्हा स्थापन केली नाही. बडोदा साहित्य संमेलनात मुख्यमंत्री आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना भेटून समिती स्थापन केली नसल्याची आठवण करून दिली. मात्र पुढे काहीच झालेले नाही. शासनदरबारी एक पत्रही पाठविण्यात आले. या समितीच्या अध्यक्षा सरोजिनी बाबर होत्या. त्यांनी गावोगावी जाऊन लोकसाहित्याचे धन जमा केले. त्यांनी अफाट काम केले. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात समितीचे अस्तित्व नसणे यासारखे दुसरे दुर्दैव नाही- प्रा.मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद
.......................
लोकसाहित्य समितीचे दहा वर्षात काहीच काम झाले नाही. समितीचे कामकाज जवळपास ठप्प झाले आहे. द.ता भोसले देखील समितीच्या कामाबददल फारसे समाधानी नव्हते. फ.मु शिंदे हेसमितीचे अध्यक्ष होते, हे देखील माहिती नव्हते. मग जर ते अध्यक्ष होते तर त्यांनी का काम केले नाही? विविध राज्यात लोकसाहित्यावर काम होत आहे शासन आणि खासगी संस्थाही करत आहेत मात्र आपल्याकडेच उदासीनता दिसून येत आहे- डॉ. अरूणा ढेरे, संमेलनाध्यक्ष
..............................
समितीची मुदत संपली आहे का नाही हे माहिती नाही. शासन मुदत संपल्याचे वगैरे काही सांगत नसते- फ.मु शिंदे, माजी अध्यक्ष लोकसाहित्य समिती