खाजगी कंपनीच्या इलेक्ट्रीक बाईक रेटिंग प्रोजेक्ट ला स्थायी समितीची मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:10 AM2020-12-09T04:10:33+5:302020-12-09T04:10:33+5:30
पुणे : खाजगी कंपनीने ग्रीन पुण्यासाठी सादर केलेला ‘इलेक्ट्रिक बाईक रेंटींग प्रोजेक्ट’ शहरात राबविण्यास मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत ...
पुणे : खाजगी कंपनीने ग्रीन पुण्यासाठी सादर केलेला ‘इलेक्ट्रिक बाईक रेंटींग प्रोजेक्ट’ शहरात राबविण्यास मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली़ याअंतर्गत शहरात भाडेतत्वावर ‘ई - बाईक्स आणि ५०० चार्जींग स्टेशन’ उभारणीसही मंजुरी दिली गेली आहे़ दरम्यान सहा महिन्यांसाठी प्रायोगीक तत्वावर हा उपक्रम राबविण्यात येणार असून, अभ्यासाअंती या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली आहे़
व्हि - ट्रो मोटर्स प्रा.लि. या मार्च महिन्यांत स्थापन झालेल्या कंपनीने पहिल्या टप्प्यात विविध ठिकाणी ५०० ई बाईक्स भाड्याने देण्याची तसेच ५०० ठिकाणी चार्जींग स्टेशन उभारण्याची संकल्पना तत्कालीन शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर यांच्याकडे मांडली होती. या ई-बाईकसाठी प्रत्येक कि.मी.ला ४ रुपये भाडेदर राहाणार असून, एक दिवसभरासाठी १५० कि.मी.ला ४५० रुपये, आठवड्यासाठी एक हजार कि.मी.ला १ हजार ९०० रुपये तर महिन्याभरासाठी ४ हजार कि.मी.साठी ३ हजार ८०० रुपये दर आकारला जाणार असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. शहरात विविध भागात एका ठिकाणी १० ई बाईक्स उभ्या करण्यात येणार असून, याकरिता ५०० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत.
जूनमध्ये सादर केलेल्या या प्रस्तावावर प्रशासनाने सकारात्मक अभिप्राय दिल्यानंतर आज स्थायी समितीच्या बैठकीमध्ये या प्रकल्पास मंजुरी देण्यात आली आहे़ परंतु, संबधित सर्व विभागांच्या परवानग्या घेतल्यानंतर हा उपक्रम सुरु करण्यात येणार असून, या उपक्रमासाठी महापालिका फक्त पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देणार असून कुठलाही खर्च करण्यात येणार नाही. उलट संबधित कंपनीला होणाºया फायद्यातून दोन टक्के उत्पन्न महापालिकेला मिळणार असल्याची माहिती हेमंत रासने यांनी दिली़
-------------------------