स्थायी समिती सभेत ऐनवेळच्या विषयाचा धडाका
By admin | Published: October 6, 2016 02:53 AM2016-10-06T02:53:45+5:302016-10-06T02:53:45+5:30
मासूळकर कॉलनी येथील आरक्षण क्र. ८५ येथे नागरी आरोग्य केंद्र रुग्णालय व निवासी डॉक्टरांचे वसतिगृह बांधण्यासाठी येणाऱ्या सुमारे २४ कोटी ९० लाख ४९ हजार रुपयांच्या खर्चासह शहरातील विविध विकासविषयक कामे
पिंपरी : मासूळकर कॉलनी येथील आरक्षण क्र. ८५ येथे नागरी आरोग्य केंद्र रुग्णालय व निवासी डॉक्टरांचे वसतिगृह बांधण्यासाठी येणाऱ्या सुमारे २४ कोटी ९० लाख ४९ हजार रुपयांच्या खर्चासह शहरातील विविध विकासविषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या सुमारे ३४ कोटी ५४ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ऐन वेळच्या ५५ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. अध्यक्षस्थानी डब्बू आसवानी होते.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला बचत गटांना खूश करण्याचे धोरण सत्ताधारी राष्ट्रवादीने आखले आहे. महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत दीड वर्षे पूर्ण झालेल्या बचत गटाला २० हजार रुपये अर्थसाहाय्य देण्यात येते. शहरात २००१पासून महिला बचत गट सुरू झाले आहेत. नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत सन २००१-०२ ते सन २०१५-१६ या १५ वर्षामध्ये एकूण ३ हजार ६१३ बचत गटांना एकूण ६ कोटी ५८ लाख ८० हजार रुपये अनुदान देण्यात आले आहे.
प्रभाग क्र. ३४ गव्हाणे वस्तीमध्ये आरक्षण क्र. ४१४ येथे बांधण्यात आलेल्या सांस्कृतिक हॉलच्या वरच्या मजल्यावर फर्निचर व्यवस्था करण्यासाठी येणाऱ्या सुमारे ३१ लाख ३२ हजार रुपयांच्या खर्चास, चिंचवड मैलाशुद्धीकरण केंद्रांतर्गत प्रभाग क्र.२६, २७ मधील काळभोरनगर, मोरवाडी परिसरातील जुन्या व खराब झालेल्या जलनि:सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी येणाऱ्या सुमारे २६ लाख ४५ हजार रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. ड प्रभागांतर्गत वाकड येथील रस्त्यावरील विद्युतविषयक कामासाठीच्या ३४ लाख ९९ हजार रुपयांच्या खर्चास, चिखली गावठाण व परिसरातील जलवाहिनीसाठी येणाऱ्या सुमारे ३७ लाखांच्या खर्चास मान्यता दिली.
प्रभाग क्र. ५३ मधील वाकड फ्लायओव्हरपासून प्रोलाइनपर्यंत २४ मीटर डीपी रस्त्याचे डांबरीकरण करणेकामी एक कोटी ३० लाख ३७ हजार रुपयांच्या खर्चास, प्रभाग क्र. ३९ संत तुकारामनगरमधील ययाती व अक्षय सोसायटी परिसरात नवीन पेव्हिंग ब्लॉक व इतर कामांसाठी येणाऱ्या ३३ लाख ८६ हजारांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग ३९ संत तुकाराम नगरमधील एकता मित्र मंडळ परिसरात स्टॉर्म वॉटर लाइन टाकण्यासाठी व कॉँक्रिट करण्यासाठी येणाऱ्या सुमारे २९ लाख ७१ हजार रुपयांच्या खर्चास, प्रभाग क्र. ५३ मधील कस्तुरी हॉटेलपासून व विनोदे वस्तीमार्गे अक्षरा स्कूलकडे जाणारा २४ मीटर डी.पी रस्ता विकसित करण्यासाठी २ कोटी ६२ लाख रुपयांच्या खर्चास, प्रभाग २२ चिंचवड गावातील थेरगाव पूल ते मोरया गोसावी मंदिर परिसर रस्ता विकसित करण्यासाठी ९९ लाख रुपयांच्या खर्चास, थेरगाव गावठाण २४ मीटर डी.पी. रस्त्याचे डांबरीकरणासाठी ५९ लाख ४८ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. (प्रतिनिधी)
४ सन २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी बचत गट अनुदानासाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार, महापालिका हद्दीतील दीड वर्षे पूर्ण झालेल्या ८४ महिला बचत गटांनी अर्ज सादर केले. या अर्जांची तपासणी केली असता, केवळ आठ अर्ज पात्र ठरले. या आठ बचत गटांना प्रत्येकी २० हजार रुपये याप्रमाणे एकूण १ लाख ६० हजार रुपये अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात दीड वर्ष पूर्ण झालेल्या बचत गटांना अर्थसाहाय्य देण्यासाठी ४० लाख रुपयांची तरतूद शिल्लक आहे. त्यामधून दीड लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे.