Pune Metro: भुयारी मेट्रोच्या फलाटावर उभे राहून न्याहाळता येणार मोकळे आकाश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 09:31 AM2022-12-02T09:31:48+5:302022-12-02T09:32:06+5:30
सिव्हिल कोर्ट भुयारी स्थानकात अभियांत्रिकी आविष्कार
राजू इनामदार
पुणे : जमिनीखाली २८ ते ३० मीटर खोलीवर ५ किलोमीटर अंतराची दोन सलग भुयारे खोदून काढणाऱ्या महामेट्रोने आता त्यांच्या सिव्हिल कोर्ट भुयारी स्थानकात आणखी एक अभियांत्रिकी आविष्कार केला आहे. या स्थानकाच्या जमिनीपासून ९० फूट खाली असणाऱ्या मेट्रोच्या फलाटावर उभे राहून प्रवाशांना वरचे मोकळे आकाश न्याहाळता येणार आहे.
मेट्रोचे सिव्हिल कोर्ट स्थानक हे इंटर चेंज स्थानक आहे. तिथे भुयारी मेट्रो व रस्त्यावरून जाणारी मेट्रो यांचे एकत्रीकरण होणार आहे. या स्थानकात एकत्र होणाऱ्या या मेट्रो तिथून बाहेर पडल्यावर पुन्हा वेगवेगळ्या होणार आहेत. याच स्थानकात महामेट्रोने हा नभांगण पाहता येणारा प्रकार भुयारी स्थानकाच्या फलाटावर केला आहे.
अशी केली रचना
- जमिनीखाली साधारण ९० फूट अंतरावर हे स्थानक आहे. त्याच्या १४० मीटर अंतराच्या फलाटाचा साधारण ४० ते ५० मीटरचा भाग हा खालून वरपर्यंत एखाद्या डक्टसारखा मोकळा असणार आहे.
- तिथून थेट फलाटावर सूर्यप्रकाश तसेच चंद्रप्रकाश पडेल अशी ही रचना आहे. वरील बाजूस काचेचा भला मोठा गोल असणार आहे. मात्र, तिथून खाली थेट फलाटापर्यंत मधे काहीच बांधकाम वगैरे नसेल. एकदम मोकळी जागाच असेल. त्यामुळे खाली फलाटावर थांबलेल्या प्रवाशाने वर पाहिले की त्याला थेट आकाशच दिसणार आहे.
- मोकळे असणारे हे अंतर वगळता फलाटाची अन्य जागा बंदिस्त असेल. प्रवाशांसाठी असलेली साधे जिने, सरकते जिने व लिफ्ट ही व्यवस्था या बंदिस्त जागेत असेल.
- शिवाजीनगर ते स्वारगेट हे मेट्रोचे ५ किलोमीटर अंतर पूर्ण भुयारी आहे. त्यात शिवाजीनगर, कसबा पेठ, सिव्हिल कोर्ट, मंडई व स्वारगेट ही स्थानके आहेत. त्यातील फक्त सिव्हिल कोर्ट भुयारी स्थानकातच अशी डक्टची व्यवस्था केली आहे.
- बाकी स्थानके बंदिस्त आहेत. त्यामध्ये वर जा-ये करण्याच्या जागेतून जे काही दिसेल तेवढेच. सिव्हिल कोर्ट स्थानकावर त्यासाठी खास वेगळे बांधकाम करण्यात आले आहे.
पुणे शहरासाठी एक वेगळा व आकर्षक प्रकार
''भुयारी स्थानके हाच पुणे शहरासाठी एक वेगळा व आकर्षक प्रकार आहे. जमिनीच्या खालून प्रथमच पुणे शहरात असा प्रवास होणार आहे. त्यातही वेगळेपण आणण्यासाठी म्हणून सिव्हिल कोर्ट स्थानकात ही खास रचना करण्यात आली आहे. - डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो.''