स्टार ९८० सरकारी कामासाठीच वापरावा लागतो कर्मचाऱ्यांना स्वत:चा मोबाईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:12 AM2021-07-30T04:12:08+5:302021-07-30T04:12:08+5:30
अनेक सरकारी कार्यालयांत लॅण्डलाईन नावालाच लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्य शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत मोबाईल वापरावर निर्बंध ...
अनेक सरकारी कार्यालयांत लॅण्डलाईन नावालाच
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत मोबाईल वापरावर निर्बंध घातले आहेत. परंतु जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेच्या विविध कार्यालयांतील लॅण्डलाईन केवळ नावालाच असल्याचे निदर्शनास आले. बहुतेक सर्व कर्मचाऱ्यांनाच सरकारी कामासाठी स्वत:चा मोबाईल वापरावा लागत असल्याचे स्पष्ट झाले.
देशातील पेगॅसस स्पायवेअर प्रकरणावरून जोरदार चर्चेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नुकताच आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत मोबाईल फोनचा वापर कमी करण्यास सांगितले आहे. या आदेशामध्ये शासनाने लॅण्डलाईन फोन वापरासाठी अधिक सोयीस्कर असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने (जीएडी) हा आदेश काढला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी आवश्यक असल्यासच अधिकृत कामांसाठी मोबाईल फोनचा वापर करावा, असे म्हटले आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन विभाग, सामान्य प्रशासन विभाग, गृह शाखेत पाहाणी केली असता कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजासाठीच मोबाईल फोनचा वापर करावा लागत असल्याचे निदर्शनास आले. तर जिल्हा परिषदेमध्येदेखील बहुतेक कर्मचाऱ्यांना सरकारी कामासाठी स्वत:चा मोबाईल वापरावा लागतो. परंतु काही कर्मचारी कार्यालयीन वेळेत फोनवरच अधिक बोलत असल्याचे निदर्शनास आले.
------
अशी आहे आचारसंहिता
कार्यालयीन कामासाठी केवळ कार्यालयीन दूरध्वनीचा वापर करावा. कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामासाठी आवश्यक तेव्हाच मोबाईलचा वापर करावा. मोबाईलवर सौम्य आवाजात बोलावे, वाद घालू नये. कार्यालयीन कामासाठी मोबाईलचा वापर करताना टेक्स्ट मेसेजचा वापर करावा. मोबाईलवर आलेले अत्यावश्यक वैयक्तिक कॉल बाहेर जाऊन घ्यावेत.
----
काम नावाला, मोबाईल कायम कानाला
जिल्हा परिषदेचे काही कर्मचारी चहा पिण्यासाठी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर तासन् तास फोनवर बोलण्यात व्यस्त असल्याचे निदर्शनास आले. परंतु हे प्रमाण खूपच कमी असून, बहुतेक कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजासाठीच मोबाईल फोनचा अधिक वापर करावा लागतो.
-----
सर्व विभागप्रमुखांना सूचना दिल्या आहेत
शासनाच्या आदेशानुसार सर्व विभागप्रमुखांना कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या मोबाईल फोन वापरण्यासंदर्भातील सूचना दिल्या आहेत. परंतु अनेक वेळा लॅण्डलाईन व्यस्त असल्यास वरिष्ठ अधिकारी अथवा महत्त्वाच्या कामासाठी मोबाईलवरच फोन करतात.
- डाॅ. जयश्री कटारे, निवासी उपजिल्हाधिकारी
-------
वैयक्तिक कामासाठी मोबाईल फोनचा वापर कमी
शासनाच्या आदेशानुसार सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत मोबाईल वापरावर घालण्यात आलेल्या निर्बंधासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु जिल्हा परिषदेत वैयक्तिक कामासाठी मोबाईल फोनचा वापर तुलनेत कमी होतो.
- एम. एस. घुले, उपमुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद
-----
कोरोनामुळे कार्यालयातील हेलपाटे कमी झाले
जिल्हाधिकारी कार्यालयात माझ्या कामासाठी मी गेल्या अनेक वर्षांपासून येत आहे. परंतु गेल्या एक-दीड वर्षात कोरोनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील हेलपाटे कमी झाले आहेत. आता नवीन अधिकारी आल्याने काम लवकर मार्गी लागेल, अशी अशा निर्माण झाली आहे.
- एम. जी. मरळ, कामासाठी आलेले नागरिक