स्टार हॉटेलही वापरतात मुदतबाह्य अन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 01:29 AM2019-01-10T01:29:42+5:302019-01-10T01:30:00+5:30

एफडीएची कारवाई : सांगूनही सुधारणा न करणाऱ्या पाच हॉटेलचा परवाना निलंबित

Star hotels also use expired food | स्टार हॉटेलही वापरतात मुदतबाह्य अन्न

स्टार हॉटेलही वापरतात मुदतबाह्य अन्न

Next

पुणे : मुदतबाह्य अन्नपदार्थांचा वापर करू नये असे सांगूनही मुदत संपलेले अन्नपदार्थ वापरणाºया थ्री स्टार हॉटेलवर अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाईचा बडगा उगारला आहे. हिंजवडी, लवासा आणि लोणावळा येथील ५ आलिशान हॉटेलचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.

अस्वच्छ वातावरणात अन्नपदार्थ तयार करणे; तसेच मुदतबाह्य अन्नपदार्थ वापरल्याप्रकरणी काही हॉटेलना सुधारणा नोटीस पाठविण्यात आली होती. त्यानंतरही संबंधित स्टार हॉटेलमध्ये ग्राहकांना मुदतबाह्य अन्नपदार्थ दिले जात असल्याचे आढळून आले आहे.
हिंजवडी येथील हयात प्लेस, हॉलिडे इन रेस्टॉरंट व लेमन ट्री हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड या हॉटेलची ३० आॅगस्ट २०१८ रोजी अन्नसुरक्षा अधिकारी संतोष सावंत यांनी तपासणी केली होती. त्यात ही हॉटेल स्वच्छतेच्या निकषात आणि मुदतबाह्य अन्नपदार्थ वापरल्या प्रकरणी दोषी ठरली होती. या प्रकरणी या हॉटेलना ६ सप्टेंबर २०१८ रोजी कारभारात सुधारणा करावी, अशी नोटीसही पाठविण्यात आली होती.

चार दिवसांचा परवाना निलंबन
या हॉटेलची फेरतपासणी करण्यात आली. त्यात हॉलिडे इन व हयात पॅलेस हॉटेलमध्ये अस्वच्छतेबाबतच मुदतबाह्य
अन्नपदार्थ आढळून आले होते. त्यामुळे हॉलिडे इनचा परवाना १५ दिवसांकरिता व हयात प्लेसचा परवाना १४ दिवसांसाठी निलंबित करण्यात आला. लेमन ट्रीवर ४ दिवसांच्या परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली.

लवासा हॉटेल लिमिटेडचे फॉरच्युनर सिलेक्ट, दासवे येथील हॉटेलची १८ आॅगस्ट रोजी तपासणी करून निकषांप्रमाणे कार्यवाही करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर केलेल्या फेरतपासणीत स्वच्छतेचे निकष न पाळल्याने हॉटेलचा परवाना ३ दिवसांकरिता निलंबित करण्यात आला.

लोणावळा येथील अप्परडेक रिसॉर्ट प्रायव्हेट लिमिटेड या हॉटेलमध्येदेखील अस्वच्छतेसह मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळून आले. त्यामुळे हॉटेलचा परवाना सहा दिवसांकरिता निलंबित करण्याचा आदेश एफडीएचे सह आयुक्त सुरेश देशामुख यांनी दिला.

थ्री स्टार दर्जाच्या हॉटेलचे ३० आॅक्टोबर २०१८ रोजी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले होते. त्यात अन्नपदार्थांच्या दक्षतेबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली होती. दोषी ठरलेल्या हॉटेलना सुधारण्याची संधीही देण्यात आली होती. त्यानंतरही संबंधित हॉटेलच्या व्यवस्थापनाने कारभारात बदल केला नाही. या हॉटेलच्या व्यवस्थापनाचा सुधारणा करण्याचा हेतू नसल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांच्यावर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबनकाळात त्यांना हॉटेलचे किचन सुरू करता येणार नाही. तसे आढळल्यास संबंधितांना आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी २ लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते.
- सुरेश देशमुख,
सह आयुक्त, एफडीए

Web Title: Star hotels also use expired food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.