आळंदीत ज्ञानेश्वरी भावकथेला प्रारंभ
By admin | Published: June 29, 2015 06:20 AM2015-06-29T06:20:50+5:302015-06-29T06:20:50+5:30
आळंदी येथे अखंड श्री हरिनामसंकीर्तन महोत्सवांतर्गत श्री चांगदेव पासष्टी चिंतन व श्री ज्ञानेश्वरी भावकथेचे भव्य आयोजन केले. रविवारपासून या महोत्सवाला सुरुवात झाली आहे.
आळंदी : अधिकमासात तब्बल १८ वर्षांनंतर आलेल्या ‘कोकिळव्रत’ या दुर्मिळ योगाचे महत्त्व विचारात घेऊन पुणे येथील श्रीराम गंगाधरजी परतानी व गणेश विठ्ठलदास सारडा परिवाराने आळंदी येथे अखंड श्री हरिनामसंकीर्तन महोत्सवांतर्गत श्री चांगदेव पासष्टी चिंतन व श्री ज्ञानेश्वरी भावकथेचे भव्य आयोजन केले. रविवारपासून या महोत्सवाला सुरुवात झाली आहे.
शुक्रवार, दि. २६ जून रोजी सकाळी ७.३० ते ९.०० या वेळेत माउलींच्या समाधी मंदिरापासून भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली. या वेळी महिलांचा मोठा सहभाग दिसून आला. ग्रंथदिंडीनंतर वीणापूजन, ग्रंथपूजन, देवतापूजन, भजनारंभ व संतपूजन असे कार्यक्रम घेण्यात आले. त्यानंतर दररोज सकाळी ९ ते ११.३० या वेळेत होणाऱ्या सकाळच्या सत्रातील वारकरी संप्रदायाचे विख्यात अध्वर्यूसंत वै. धुंडामहाराज देगलूरकर यांचे नातू व सुप्रसिद्ध व्याख्याते व कीर्तनकार ह.भ.प. श्री चैतन्य महाराज देगलुरकर यांच्या आळंदीतील प्रथमच होणाऱ्या चांगदेव पासष्टी चिंतन मराठी भाषेतून श्रवण करण्याची संधी भाविकांना मिळाली. तर, दुपारच्या सत्रात होणाऱ्या दुपारी ३ ते सायं. ६.३० या वेळेतील जगविख्यात भावकथा प्रवक्ते महर्षी वेद व्यास प्रतिष्ठानचे संस्थापक स्वामी गोविंदगिरीजीमहाराज यांचे ज्ञानेश्वरी भावकथेचे हिंदी भाषेतील निरुपण श्रवण करण्याची संधी भाविकांनी मिळाली. त्यानंतर दररोज रात्री ८ ते १० या वेळेत वारकरी संकीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्वश्री ह.भ.प. यशोधनमहाराज साखरे, डॉ. रामकृष्णमहाराज लहवितकर, संदीपानमहाराज शिंदे, प्रमोदमहाराज जगताप, जयवंतमहाराज बोधले, ज्ञानेश्वरमहाराज साधु, चैतन्यमहाराज देगलुरकर, माधवदासमहाराज राठी या महाराष्ट्रातील नामवंत वक्त्यांचे कीर्तन होणार आहे. दि. २६ जून ते ३ जुलैपर्यंत हा महोत्सव होणार आहे.
सनातन हिंदू धर्माच्या परंपरेच्या कालगणनेप्रमाणे साधारणत: ३० महिन्यांनंतर येणारा हा अधिकमास म्हणून ओळखला जातो. यंदा मात्र हा आषाढ महिना १८ वर्षांनंतर अधिक आषाढ म्हणून आला असून, या पर्वकाळात ‘कोकिळव्रता’चे विशेष महत्त्व असते. या अधिकमासात अधिकस्थ अधिकम् फलम् असल्याने आम्ही या सेवाभावी व्रतातून या महोत्सवाचे आयोजन के ल्याचे श्रीराम परतानी व गणेश सारडा यांनी सांगितले.
दिंडी प्रदक्षिणाने शुभारंभ झालेल्या या महोत्सव शुभारंभप्रसंगी मारुतीमहाराज कुऱ्हेकर, दिनकरमहाराज आंचवल, चक्रांकितमहाराज, भानुदासमहाराज देगलुरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.