वाहन उद्योगाशी स्टार्ट अपला देणार चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:12 AM2021-02-09T04:12:39+5:302021-02-09T04:12:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : वाहन संशोधन, चाचण्या व प्रमाणीकरण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण संस्था असलेल्या ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वाहन संशोधन, चाचण्या व प्रमाणीकरण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण संस्था असलेल्या ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय)ने वाहनउद्योगाशी संबंधित स्टार्ट अप इकोसिस्टिमला (नवसंकल्पनांसाठीची आवश्यक परिसंस्था) चालना देण्यासाठी अटल इनोव्हेशन मिशन–नीती आयोग यांसोबत करार केला आहे. यासंदर्भातील इरादा करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
याबद्दल एआरएआयचे संचालक डॉ. रेजी मथाई म्हणाले, “वाहन उद्योग व दळणवळण क्षेत्राशी संबंधित स्टार्ट अपना मदत करण्यासाठी एआरएआयच्या वतीने ‘टेक्नोव्हस’ या ऑनलाईन व्यासपीठाची निर्मिती करण्यात आली आहे. या अंतर्गत स्टार्ट अपना या क्षेत्रातील एआरएआयचा प्रदीर्घ अनुभव, कौशल्य आणि उपकरणे यांचा उपयोग करून घेता येईल. प्रारंभी अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत येणाऱ्या स्टार्ट अपचा यात समावेश असेल.”
अटल इनोव्हेशन मिशनचे संचालक आर. रामाणन म्हणाले, “देशाच्या वाहनउद्योग क्षेत्रातील समस्या सोडविण्यासंदर्भात विद्यार्थ्यांची मानसिकता तयार करणे हा आमचा उद्देश आहे. शहरांबरोबरच खेड्यांमध्येही दळणवळण, विद्युत दळणवळण (इलेक्ट्रिक मोबिलिटी), वाहतूक, शाश्वत विकास व डिजिटल पायाभूत सोयीसुविधा निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट असेल.”
या करारासंदर्भात अधिक माहिती देताना उपक्रमाच्या समन्वयिका उज्ज्वला कार्ले म्हणाल्या की, अटल न्यू इंडिया चॅलेंजेस (एएनआयसी) अंतर्गत रस्ते व महामार्ग वाहतूक मंत्रालयाच्या अखत्यारीत करण्यात येत असलेल्या उपाययोजना व समस्यांवर आम्ही काम करणार आहोत. सामाजिक दृष्ट्या उपयुक्त रस्ते सुरक्षा, दळणवळण व वाहनासाठी आवश्यक सुटे भाग यांच्याशी निगडीत नवसंकल्पनांचा यात समावेश असेल. पहिल्या टप्प्यात १५ फेब्रुवारी, २०२१ पर्यंत स्टार्ट अपना aim@technovuus.araiindia.com या मेल आयडी वर संपर्क साधता येईल.