भोसरी ते मंचर पीएमपीची बससेवा चालू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:08 AM2021-06-20T04:08:08+5:302021-06-20T04:08:08+5:30
आंबेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उद्योग व्यवसाय नसल्याने मंचर, अवसरी, कळंब, पेठ, पारगाव, गावडेवाडी, भोरवाडी या भागातील सुशिक्षित तरुण तसेच ...
आंबेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उद्योग व्यवसाय नसल्याने मंचर, अवसरी, कळंब, पेठ, पारगाव, गावडेवाडी, भोरवाडी या भागातील सुशिक्षित तरुण तसेच आयटीआय झालेले तरुण नोकरीनिमित्त चाकण, भोसरी, आळंदी, खेड, तळेगाव, रांजणगाव, कारेगाव आदी एमआयडीसीमध्ये कंपनीत नोकरीनिमित्त दररोज ये-जा करत आहेत. परंतु एसटी बसची सेवा अपुरी व वेळेत नसल्याने नोकरदार वर्गाला खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. किंवा मोटारसायकल वरून ये-जा करावी लागत आहे. पावसाळ्यात मोठी कसरत करत नोकरीच्या ठिकाणी ये-जा करावी लागत आहे. पीएमपीएलची बससेवा राजगुरूनगर, खेडपर्यंत चालू आहे. त्यामुळे येथील कामगार व खासगी प्रवाशांना मिळेल त्या खासगी वाहनांचा आधार घेऊन खेडपर्यंत ये-जा करावी लागत आहे.
आंबेगाव तालुक्यात मंचर येथे स्वतंत्र एसटी डेपो मंजूर होऊन पाच वर्षे होऊन गेले आहेत. एसटी डेपोसाठी अवसरी हद्दीत पाच एकर क्षेत्रात एसटी डेपोचे बांधकाम पूर्ण झाले आहे. प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे, मात्र एसटी डेपोसाठी लागणारे डिझेल पंपाचे काम अद्याप चालू नसल्याने मंचर एसटी डेपोचे उद्घाटन रखडले असल्याचे सांगण्यात येत आहे. मंचर एसटी डेपो चालू झाल्यानंतर आंबेगाव तालुक्यातील जनतेचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.