बंद पडलेली विकास कामे सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:13 AM2021-08-15T04:13:13+5:302021-08-15T04:13:13+5:30
वासुंदे : कुसेगाव (ता. दौंड) येथील विविध योजनेतून मंजूर असलेल्या विकासकामांना राजकीय हस्तक्षेपाचे ग्रहण लागल्याने सुरु केलेली कामे बंद ...
वासुंदे : कुसेगाव (ता. दौंड) येथील विविध योजनेतून मंजूर असलेल्या विकासकामांना राजकीय हस्तक्षेपाचे ग्रहण लागल्याने सुरु केलेली कामे बंद पडली आहेत. त्यामुळे बंद पडलेली विकासकामे पुन्हा सुरु करावीत, अशी मागणी कुसेगावचे माजी सरपंच मनोज फडतरे यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
डीपीसी योजनेअंतर्गत अंगणवाडी इमारत बांधकाम सन २०१९-२०, जिल्हा ग्राम विकास निधीतून बाजारगाळे इमारत बांधकाम व स्किल डेव्हलपमेंट सेंटर तसेच १४ व्या वित्त आयोगातून महिला अस्मिता भवन ही सुरु करण्यात आले होते. मात्र, या विकासकामांमध्ये गावातील काही लोकांनी राजकीय हस्तक्षेप करुन बंद पाडली आहेत. सदरची कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप करण्यात आला. यावर ग्रामपंचायत प्रशासनाने तांत्रिक तपासणी अहवाल मागवल्यानंतर सदर बांधकामांची तांत्रिक तपासणी राज्य गुणवत्ता निरीक्षक-2 यांनी केली असता सदर कामांत कोणत्याही त्रुटी नाहीत असा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानंतर सुद्धा ग्रामपंचायत प्रशासन सदरील कामे सुरु करण्यास टाळाटाळ करीत आहे, असे लेखी निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे.
गावातील विकास कामांसाठी शासन मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत असताना ग्रामपंचायत प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे कुसेगाव विकासापासून वंचित राहत आहे.
- मनोज फडतरे, माजी सरपंच, कुसेगाव
सदर विकासकामांना काही ग्रामस्थांचा विरोध असला तरीसुद्धा सर्वांना विश्वासात घेऊन अस्मिता भवन, बाजारगाळे व ग्रामसचिवालय एकत्रितपणे बांधण्याचा ग्रामपंचायत प्रशासनाचा निर्धार आहे.
- छाया शितोळे, सरपंच कुसेगाव