समाविष्ट गावांमध्ये कचऱ्याबाबत माहिती संकलन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:08 AM2021-07-18T04:08:38+5:302021-07-18T04:08:38+5:30
पुणे : महापालिकेच्या हद्दीमध्ये २३ गावांचा समावेश करण्यात आल्यानंतर तेथील पायाभूत सुविधांसाठी पालिकेने नियोजन सुरू केले आहे. या गावांमध्ये ...
पुणे : महापालिकेच्या हद्दीमध्ये २३ गावांचा समावेश करण्यात आल्यानंतर तेथील पायाभूत सुविधांसाठी पालिकेने नियोजन सुरू केले आहे. या गावांमध्ये दैनंदिन जमा होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण आणि त्याच्या विल्हेवाटीची व्यवस्था याचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील कचरा समस्या गंभीर आहे. कचरा संकलन आणि त्याचे व्यवस्थापन यावर नियोजनात्मक काम झालेले नाही. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाल्याने लोकवस्तीही वाढली आहे. हा कचरा मोकळी जागा दिसेल तिथे टाकला जातो. रस्ते, नदी पात्र, कालवे अथवा नाल्यांमध्ये कचरा टाकला जात असून हा कचरा उचलला जात नाही. त्यामुळे तेथेच कुजून दुर्गंधी पसरते. कुत्री, डुकरे हा कचरा मुख्य रस्त्यावर आणतात.
घनकचरा विभागाने याचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून सध्याची कचरा विल्हेवाटीची पद्धती काय आहे?, ओल्या व सुक्या कचऱ्याचे प्रमाण किती आहे? वाहतूक व्यवस्था कशी आहे? नेमकी किती वाहने उपलब्ध आहेत? या कामाकरिता किती मनुष्यबळ उपलब्ध आहे तसेच कचरा प्रकल्पांसाठी गायरान जमिनी उपलब्ध आहेत का? अशा माहितीचे संकलन सुरू करण्यात आले आहे.
====
पालिकेच्या हद्दीत रोज संकलित होणारा कचरा - १८५० टन
ओला कचरा - ७५० टन
सुका कचरा - ८०० टन
मिश्र कचरा - २५० टन
पुनर्प्रक्रिया होणारा कचरा - १२० टन
====
समाविष्ट गावांमध्ये निर्माण होणारा कचरा - २५० टन
सर्वाधिक कचरा निर्माण होणारी गावे - नऱ्हे, कोंढवे-धावडे, वाघोली, मांजरी बुद्रूक (१३६ टन)