नाताळाला उत्साहात प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 01:41 AM2018-12-25T01:41:19+5:302018-12-25T01:41:37+5:30
पुणे शहरात मंगळवारी मध्यरात्री शहरातील सर्व चर्चमधून नाताळाच्या निमित्ताने मध्यरात्रीची उपासना (वॉचनाईट सर्व्हिस) करण्यात आली.
पुणे : शहरात मंगळवारी मध्यरात्री शहरातील सर्व चर्चमधून नाताळाच्या निमित्ताने मध्यरात्रीची उपासना (वॉचनाईट सर्व्हिस) करण्यात आली. यातून प्रभू येशूंच्या जन्मोत्सवाचा आनंद साजरा करण्यात आला.
\
सिटी चर्च, सेंट पॉल चर्च, सेंट पॅट्रिक चर्च, ख्राईस्ट चर्च, सेंट मॅथ्यू चर्च, पंचहौद येथील पवित्रनाम देवालयात मध्यरात्रीची उपासना करून येशू ख्रिस्ताच्या जन्माचे स्वागत करण्यात आले. याबरोबरच सर्व चर्चमधून येशु ख्रिस्ताच्या जन्माचे देखावे (गवानी) उभारण्यात आले आहे. तसेच, सर्व चर्चमधून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मागील आठवड्यात सर्व चर्चमधून आनंदगीते (कँरल सिंगिंग) गाण्यात आली. त्यातून ख्रिस्तोत्सवाचा आनंद साजरा करण्यात आला. नाताळ किंवा ख्रिसमस हा ख्रिश्चनधर्मीयांचा एक महत्त्वपूर्ण सण आहे. २५ डिसेंबर, येशूंचा जन्मदिवस - दरवर्षी याच दिवशी नाताळाचा सण साजरा करण्यात येतो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण १२ दिवसांच्या ख्रिसमस्टाईड नावाच्या पर्वाची सुरुवात करतो.
ख्रिश्चन बांधव या सणाला महत्त्व देतात. कारण, जिझस ईश्वराचे पुत्र असल्याची त्यांची श्रद्धा आहे. नाताळ हा आनंद व हर्षोल्साचा सण आहे. ख्रिसमसचा शब्दश: अर्थ- क्राइस्ट्स मास अर्थात येशूच्या जन्मानिमित्त करण्यात येणारी सामूहिक प्रार्थना.
कॅम्प परिसरातील वाहतुकीत बदल
ख्रिसमस सणानिमित्ताने कॅम्प परिसरातील महात्मा गांधी रोडवर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते़ त्यामुळे या भागातील वाहतूककोंडी टाळण्यासाठी मंगळवारी या परिसरातील वाहतुकीत सायंकाळ ७ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत बदल करण्यात आला आहे़
गोळीबार मैदान चौकातून महात्मा गांधी रोड व पूलगेटकडे जाणाऱ्या रोडवरील वाय जंक्शनवरुन एमजी रोडकडे येणारी वाहतूक १५ आॅगस्ट चौक येथे बंद करून ती कुरेशी मशीद व सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात येणार आहे़
इस्कॉन मंदिर चौकातून डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळा, आरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक बंद करुन ती एसबीआय हाऊस चौकाकडे वळविण्यात येईल़ व्होल्गा चौकातून महमंद रफी चौकाकडे जाणारी
वाहतूक बंद करुन ही वाहतूक सरळ ईस्ट स्ट्रीट रोडने इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येईल़
इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येऊन ती इंदिरा गांधी चौकाकडून लष्कर पोलीस स्टेशन चौकाकडे वळविण्यात येईल़ सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे येणारी वाहतूक बंद करुन ती ताबुत स्ट्रीट रोड मार्गे वळविण्यात येईल़
वाहनचालकांनी या पर्यायी रस्त्यांचा वापर करुन वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे़