भोर व नसरापूर येथे सर्पदंश व श्वानदंश प्रथम उपचार केंद्र सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:11 AM2021-05-11T04:11:33+5:302021-05-11T04:11:33+5:30
भोर : भोर तालुक्यातील डोंगरी दुर्गम भाग असून शेतात व रानावनात सर्पदंश तसेच श्वानदंश होण्याच्या घटना घडत असताना त्यांच्यावर ...
भोर : भोर तालुक्यातील डोंगरी दुर्गम भाग असून शेतात व रानावनात सर्पदंश तसेच श्वानदंश होण्याच्या घटना घडत असताना त्यांच्यावर प्राथमिक औषधोपचार मिळत नसल्याने रुग्णांचा मृत्यू होत आहे, हे टाळण्यासाठी आणी वेळेत उपचार मिळण्यासाठी भोर व नसरापूर या दोन ठिकाणी सर्पदंश व श्वानदंश लस मिळावी आणि प्रथम उपचार केंद्र सुरू करावे म्हणून भोर पंचायत समितीचे उपसभापती लहूनाना शेलार यांनी उपविभागीय आधिकारी व गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
एप्रिल व मे महिन्यात उन्हाचा तडाखा आणी शेतीची कामे
असतात शेतकरी शेतात जातात यावेळी सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात. मात्र, लस उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रुग्ण दगावण्याच्या घटना घडत आहेत यामुळे भोर व नसरापूर येथे सर्पदंश, श्वानदंश यांच्या लसी मिळाव्यात आणी प्राथमिक उपचार करावेत
दोन दिवसांपूर्वी भोर तालुक्यातील कांबरे येथील पूजा रामदास मोहिते (वय १७) हिला शेतामध्ये सर्पदंश झाला तिला प्राथमिक आरोग्य केंद्र व अन्य ठिकाणी सर्पदंशाची लस नसल्यामुळे तसेच ससून पुणे येथे उपचारासाठी नेत असताना वेळेत उपचार मिळाले नसल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिच्या मृत्यूस जबाबदार कोण? त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी लहूनाना शेलार यांनी केली आहे.दरम्यान शनिवार (दि.८) रोजी सर्पदंशाने मृत्यू पावलेल्या पूजा मोहिते हिच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबीयांचे शेलार यांनी सांत्वन केले.
भोर तसेच नसरापूर या दोन ठिकाणी सर्पदंश व श्वानदंश प्रथम उपचार केंद्र सुरू करावी, अशी मागणी उपसभापती लहू नाना शेलार यांनी प्रांत अधिकारी राजेंद्रकुमार जाधव व गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांच्याकडे केली आहे.