राज्य बँकेत परदेशी चलनाचे व्यवहार सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 08:10 PM2018-07-11T20:10:08+5:302018-07-11T20:29:35+5:30

प्रतिवर्षी तब्बल १ हजार कोटी रुपयांचे परदेशी चलनाचे व्यवहार राज्य बँक सांभाळत होती. मात्र, अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर अमेरिकेने परकीय चलनाचे व्यवहार अतिशय कडक केले.

start foreign exchange transactions at rajya sahkari bank | राज्य बँकेत परदेशी चलनाचे व्यवहार सुरु

राज्य बँकेत परदेशी चलनाचे व्यवहार सुरु

Next
ठळक मुद्देसाखर कारखान्यांना होणार फायदा : वर्ल्ड ट्रेडवरील हल्ल्यानंतर व्यवहार झाले होते बंद नुकतेच अमेरिकेतील हबीब अमेरिकन बँक, न्यूयॉर्कने राज्य बँकेचे नॉस्ट्रो खाते सुरुकेंद्र सरकारने साखर निर्यातीसाठी प्रतिगोणी ५५ रुपयांचे अनुदान जाहीर

पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला पुन्हा परदेशी चलनाचे विनिमय करण्यासाठी रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने (आरबीआय) परवानगी दिली आहे. अशी परवानगी मिळालेली राज्य सहकारी बँक देशातील एकमेव सहकारी बँक ठरली आहे. अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यानंतर तडकाफडकी विदेशी विनिमयाची परवानगी रद्द करण्यात आली होती. नव्याने मिळालेल्या या परवान्यामुळे साखर कारखान्यासह राज्यातील विविध आस्थापनांना फायदा होणार आहे. 
राज्य सहकारी बँकेला आरबीआयने १९८८ साली विदेश विनिमयाचा परवाना दिला होता. या व्यवहारासाठी आवश्यक ‘नॉस्ट्रो’ खाते राज्य बँकेने बँक आॅफ इंडियामध्ये उघडले होते. त्या माध्यमातून विदेशी चलनाचे व्यवहार करण्यात येत होते. राज्य बँकेने कर्ज पुरवठा केलेल्या सूतगिरण्या तसेच साखर कारखान्यांच्या आयात निर्यातीसाठी त्याचा चांगला फायदा होत होता. राज्यातील जिल्हा आणि नागरी बँकांकडे अशा प्रकारचा परवाना नव्हता. त्यामुळे त्यांच्याकडील खातेदारांचे व्यवहार देखील राज्य बँकेमार्फत करण्यात येत होते. या व्यवहारातील कमिशन दोन्ही बँका निम्मे वाटून घेत. 
अमेरिकन डॉलर, ब्रिटीश पौंड, युरो आणि जापनीज येन चलनाचे व्यवहार या माध्यमातून केले जातात. जगभरातील व्यवहार प्रामुख्याने डॉलरमध्ये होत असल्याने, अर्थातच डॉलर मधील व्यवहारांचे प्रमाण जास्त होते. त्या वेळी प्रतिवर्षी तब्बल १ हजार कोटी रुपयांचे परदेशी चलनाचे व्यवहार राज्य बँक सांभाळत होती. मात्र, अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर अमेरिकेने परकीय चलनाचे व्यवहार अतिशय कडक केले. दहशतवाद्यांना बाहेरुन पतपुरवठा होऊ नये यासाठी अमेरिकेने ‘पॅट्रीअ‍ॅक्ट’ लागू केला. त्यामुळे राज्य बँकेतील विदेशी चलनाचे व्यवहार बंद झाले होते. 
विदेशी चलनाचे व्यवहार पुन्हा सुरु करावेत यासाठी राज्य बँकेकडून प्रयत्न सुरु होते. नुकतेच अमेरिकेतील हबीब अमेरिकन बँक, न्यूयॉर्कने राज्य बँकेचे नॉस्ट्रो खाते सुरु केले आहे. त्यामुळे राज्य बँक आयात निर्यात व्यवहार सुरु करु शकणार असल्याची माहिती राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली. 
----------------

राज्यातून विदेशात साखर निर्यात होते. नुकतीच केंद्र सरकारने निर्यातीसाठी प्रतिगोणी ५५ रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. त्यामुळे राज्य बँकेतील सुविधेचा साखर कारखान्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. 
विद्याधर अनास्कर, अध्यक्ष, राज्य सहकारी बँक प्रशासकीय मंडळ 
.......................

Web Title: start foreign exchange transactions at rajya sahkari bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.