महावितरणची उपकेंद्रे तातडीने सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:09 AM2021-05-13T04:09:53+5:302021-05-13T04:09:53+5:30

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर, भोर, पुरंदर, हवेली आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघांत प्रस्तावित असलेली महावितरणची उपकेंद्रे लवकरात लवकर ...

Start MSEDCL sub-centers immediately | महावितरणची उपकेंद्रे तातडीने सुरू करा

महावितरणची उपकेंद्रे तातडीने सुरू करा

Next

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर, भोर, पुरंदर, हवेली आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघांत प्रस्तावित असलेली महावितरणची उपकेंद्रे लवकरात लवकर सुरू करून घ्यावीत, अशी सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना केली.

याशिवाय पावसापूर्वीची कामे तातडीने पूर्ण करून घ्यावीत, असेही त्यांनी सांगितले. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सुळे यांनी सोमवारी (दि. १०) मतदारसंघातील विजेच्या प्रश्नांचा आढावा घेतला. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, मतदारसंघाचे समन्वयक प्रवीण शिंदे, महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, पुणे विभागीय मुख्य अभियंता सचिन तालेवार, बारामती विभागाचे मुख्य अभियंता सुनील पावडे, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

मतदारसंघातील बहुतांशी ग्रामपंचायतींकडे थकीत असलेली वीजबिले तसेच कृषिपंपाची बिले जास्तीत जास्त भरली गेली, तर निधीची उपलब्धता होऊन कामे मार्गी लागण्यास मदत होईल, अशी अपेक्षा महावितरणचे प्रादेशिक संचालक नाळे यांनी व्यक्त केली. शिवतरे यांनी कोणाची बिले थकीत आहेत आणि कोणाची पूर्ण वसुली झाली आहे, याबाबत महावितरणकडून स्पष्ट माहिती वेळेवर मिळत नाही. ज्यांनी बिले भरली आहेत, त्यांचीही कामे लवकर होत नाहीत, याकडे लक्ष वेधून तोडगा काढण्याची मागणी केली. त्यावर महावितरणने एक स्वतंत्र यंत्रणा तयार करावी. त्याद्वारे संपूर्ण चित्र स्पष्ट होऊन पुन्हा पुन्हा पाठपुरावा करण्याची गरज पडणार नाही, असा तोडगा खासदार सुप्रिया सुळे यांनी सुचवला. त्या अनुषंगाने यंत्रणा तयार करण्यात येईल, असे नाळे यांनी सांगितले.

भोर तालुक्यातील न्हावी येथे उपकेंद्र मंजूर झाले असून ते सध्या निविदाप्रक्रियेत आहे. लवकरच ते उभे राहील. याशिवाय भोर-वेल्हा-मुळशी विधानसभा मतदारसंघात भूगाव आणि मुठा, नसरापूर, पुरंदर तालुक्यात कोळविहिरे आणि माहूर, इंदापूर तालुक्यात झगडेवाडी, निगुर्डे, बारामती तालुक्यात मुढाळे, हवेली तालुक्यात भैरवनाथ, ब्रह्मा या वीज उपकेंद्रांचे प्रश्न तातडीने सोडवावेत, अशा सूचना सुप्रिया सुळे यांनी केल्या. मुळशी तालुक्यासाठी पिरंगुट घाटात गायरान असून तेथे उपकेंद्र होऊ शकते, अशी माहिती महादेव कोंढरे यांनी दिली. त्यानुसार प्रस्ताव तयार करण्याबाबत या वेळी चर्चा झाली. वारजे भागात गणपती माथा येथे उपकेंद्रांची नितांत गरज असून यासंदर्भात पुणे महापालिकेकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही सुप्रिया सुळे यांनी दिली.

मोबाईल टॉवर उभे राहिले; लाईटचे काय

खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून भोर-वेल्हा-मुळशी विधानसभा मतदारसंघात बीएसएनएलचे तब्बल ५४ टॉवर मंजूर झाले असून, बहुतांशी टॉवरचे काम पूर्ण होत आले आहे. लवकरच पूर्ण क्षमतेने त्यांचे काम सुरू होईल. एकीकडे मोबाईलचे टॉवर उभे रहात असताना वीजपुरवठा मात्र होत होत नाही, असे का? असा प्रश्न रणजित शिवतरे यांनी उपस्थित केला. त्यावर स्वत: खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रश्न विचारत बीएसएनएल टॉवरला वीज का? नाही मिळत, असा सवाल केला. त्यावर लवकरात लवकर ही अडचण सोडविण्यात येईल, असे आश्वासन महावितरणकडून देण्यात आले.

Web Title: Start MSEDCL sub-centers immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.