पुणे स्टेशनसह मेट्रो स्थानकांपासून ‘शेअर ए रिक्षा’ योजनेला सुरूवात
By नितीश गोवंडे | Published: August 9, 2023 10:26 PM2023-08-09T22:26:38+5:302023-08-09T22:26:53+5:30
पुणे : शहरातील १८ मेट्रो स्थानकांवरून प्रवाशांना मेट्रोने प्रवास करता येत आहे. या मेट्रो स्थानकावरून शहरातील विविध भागात ये-जा ...
पुणे : शहरातील १८ मेट्रो स्थानकांवरून प्रवाशांना मेट्रोने प्रवास करता येत आहे. या मेट्रो स्थानकावरून शहरातील विविध भागात ये-जा करण्यासाठी आरटीओ प्रशासनाने आता ‘शेअर ए रिक्षा’ ही योजना सुरू केली आहे. शहरातील १८ मेट्रो स्टेशनवरून ही सेवा उपलब्ध होईल. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
आरटीओच्या समितीने पुणे रेल्वे स्थानकासह मेट्रो च्या सर्व स्थानकांवर सर्व्हेक्षण केले. त्यानंतर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत या योजनेला मान्यता देण्यात आली. पुण्यासह पिंपरी-चिंचवड भागात आता मेट्रो सुरू करण्यात आली आहे. शिवाजीनगर कोर्ट ते पिंपरी चिंचवड, गरवारे ते रूबी हॉल ते वनाज या मार्गावर मेट्रो धावण्यास सुरवात झाली आहे. मेट्रोचे जाळे विस्तारल्याने नागरिक देखील आता मेट्रोतून प्रवासाला प्राधान्य देत आहेत.
मेट्रो स्थानकावर येण्यासाठी किंवा स्थानकावरून शहरातील इतर भागात ये-जा करण्यासाठी आता आरटीओ प्रशासनाकडून शेअर रिक्षा योजना सुरू करण्यात आली आहे. यासाठी आरटीओ प्रशासनाने एक समिती गठीत करून पुण्यातील मेट्रो स्थानकांवर सर्व्हे केला होता. या सर्व्हेअंती आरटीओच्या समितीने शहरातील अठरा स्थानकांवरून शेअर रिक्षा सुरू करण्याचे निश्चित केले आहे.
त्यानुसार आता या स्थानकांवरुन नागरिकांना माफक दरात रिक्षाने देखील प्रवास करता येणार आहे. ज्या नागरिकांना मीटर दराप्रमाणे रिक्षा आवश्यक आहे, त्यांना मीटरप्रमाणे रिक्षा उपलब्ध होणार आहे. या अठरा स्थानकांसह पुणे स्टेशनवरून देखील शेअर रिक्षा सुविधा उपलब्ध होणार आहे. रेल्वे स्टेशन ते पुलगेट, वाडीया कॉलेज, संचेती हॉस्पिटल या मार्गांवर प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. तसेच, नागरिकांसाठी मीटर रिक्षांचा पर्याय देखील उपलब्ध आहे.
...या स्थानकांवर शेअर रिक्षास्टॅण्ड..
वनाज मेट्रो स्टेशन, आनंदनगर, आयडियल कॉलनी, नळस्टॉप, गरवाजे कॉलेज, पीएमसी, सिव्हील कोर्ट, मंगळवार पेठ, पुणे स्टेशन, रुबी हॉल, शिवाजीनगर, बोपोडी, दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, भोसरी - नाशिक फाटा, संत तुकाराम नगर, पीसीएमसी या स्थानकांचा यात समावेश आहे.
आम्ही शहरातील १८ मेट्रो स्थानकांसह रेल्वे स्टेशनवरून ‘शेअर ए रिक्षा’ सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यासाठी भाडे किती आकारावे हे देखील ठरवून दिलेले आहे. यासह ज्यांना मीटरप्रमाणे रिक्षाने प्रवास करायचा असेल तर ती सुविधा देखील मिळणार आहे. यामुळे नागरिकांसह रिक्षा चालकांना देखील फायदा होणार आहे.
- संजीव भोर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे