कात्रज ते तोरणा गड पीएमपीएमएल बससेवा सुरू करा;आमदार शंकर मांडेकर यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 17:38 IST2025-01-11T17:38:09+5:302025-01-11T17:38:41+5:30
पीएमपीएमएल बससेवा वेल्हे या ठिकाणाहून बंद झाल्याने सध्या उपलब्ध असलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी पडत आहे.

कात्रज ते तोरणा गड पीएमपीएमएल बससेवा सुरू करा;आमदार शंकर मांडेकर यांची मागणी
वेल्हे : कात्रज ते तोरणा गड (वेल्हे) पीएमपीएमएल बससेवा सुरू करण्याची मागणी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष यांच्याकडे भोर-मुळशी-राजगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांनी केली आहे.
आमदार शंकर मांडेकर यांनी पीएमपीएमएलला एक निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, ग्रुप ग्रामपंचायत वेल्हे बु. हे तालुका मुख्यालय असून गावची लोकसंख्या ही वर्ष २०११ चे जनगणनेनुसार २४२० इतकी आहे. परंतु, परिसरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वेल्हे बु. हे गाव मोठ्या प्रमाणात विस्तारित आहे. या गावामधून रोज दैनंदिन कामानिमित्त, व्यवसाय, शिक्षण, आरोग्य व शेतीच्या बाजारपेठेच्या निमित्ताने पुणे शहर व पुण्याच्या इतरत्र भागांमध्ये नियमितपणे प्रवास करणाऱ्यांची फार मोठी संख्या आहे.
पूर्वी पीएमपीएमएल बससेवा सुरू होती; परंतु नंतरच्या काळात सुरू असलेली पीएमपीएमएल बससेवा वेल्हे या ठिकाणाहून बंद झाल्याने सध्या उपलब्ध असलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी पडत आहे. त्याचबरोबर खंडित प्रवासामुळे मानसिक ताण-तणाव वाढत असून नागरिकांना अनेक समस्यांना तोड द्यावे लागत असल्याचे आमदार शंकर मांडेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.