पुणे - नाशिक रेल्वेसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करा ; विभागीय आयुक्त सौरभ राव यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 06:41 PM2020-08-25T18:41:06+5:302020-08-25T18:41:53+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चेत असलेला पुणे - नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग आता खऱ्या अर्थाने रुळावर येण्याची तयारी सुरू झाली
पुणे : पुणे - नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी आवश्यक असलेले भूसंपादनाचे काम निधीची वाट न पाहता त्वरीत सुरू करण्याचे आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी संबंधित उपविभागीय अधिकारी यांना दिले आहेत. यासाठी पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील सुमारे ५७५ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार असल्याचे राव यांनी सांगितले.
गेल्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चेत असलेला पुणे - नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग आता खऱ्या अर्थाने रुळावर येण्याची तयारी सुरू झाली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा केवळ "कोरोना" या एकाच कामात व्यस्त आहेत. परंतु मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणेला आता कोरोना सोबतच प्रलंबित विकास कामांना गती देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार (दि.२५) रोजी बैठक घेण्यात आली. याबाबत राव यांनी सांगितले, पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यातील सुमारे १४७० हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यातील हवेली, खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील ५७५ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. भूसंपादना संदर्भात रेल्वे विभागाकडून प्रस्ताव दाखल झाले आहेत. या ५७५ हेक्टर जमिनीसाठी १२०० ते १५०० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. परंतु रेल्वेकडून अद्याप कोणताही निधी मिळालेला नाही. भूसंपादनासाठी आवश्यक असलेला निधी मिळण्यासाठी त्वरीत निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भातील प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.
---
भूसंपादनासाठी चार उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती
पुणे - नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनासाठी हवेली, खेड,आंबेगाव आणि जुन्नर उपविभागीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली . या अधिकाऱ्यांनी भूसंपादनासाठी आवश्यक जमिनीसाठी मोजणी करणे, सर्च रिपोर्ट तयार करण्याचे काम त्वरित सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.