पुण्यात स्टार्टअपला मिळतेय चालना, विद्यार्थीही मिळवताहेत अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 03:41 PM2017-11-23T15:41:58+5:302017-11-23T15:54:27+5:30
शिकता शिकता स्वत:चं काहीतरी सुरु करण्याची हल्लीच्या विद्यार्थ्यांची इच्छाशक्ती खरंच कौतुकास्पद आहे.
पुणे : पूर्वी काही नवीन करायचं म्हटलं की आपल्याकडे मुंबई, दिल्ली, बंगळुरू असेच पर्याय समोर होते. मात्र गेल्या काही वर्षांत या शहरांमध्ये पुण्याचीही गणना केली जात आहे. पुण्यात सध्या अनेक कंपन्या स्थापन झाल्यात. स्टार्टअपच्या नावाखाली अनेक तरुणांनीही उद्योगविश्वात उडी मारली. शिक्षण घेऊन कोणाच्या हाताखाली १०-१२ तास करण्यापेक्षा आपणच आपला व्यवसाय सुरू करावा अशी संकल्पना लोकांमध्ये रुजते आहे. आणि हा व्यवसाय करण्यासाठी आता आपण राहत असलेल्या जागेवरही करता येणं शक्य झाल्याने पुण्यातील अनेक तरुणांनी आपले छोटे-मोठे व्यवसाय निर्माण केले. एवढंच कशाला, पैसा कमवण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाल्याने लोक पार्टटाईम व्यवसायही करू लागले. सकाळी ठराविक वेळेत नोकरी केल्यानंतर घरी आल्यावर व्यवसाय करण्याची वृत्ती निर्माण झाली. पुण्यात गेल्या काही वर्षात व्यवसायाला कशी चालना मिळाली, तिकडे स्टार्टअप सुरू करण्यामागे तरुणांचे काय निष्कर्ष आहेत, हे आज आपण पाहुया.
शैक्षणिक संस्था वाढल्याने स्टार्टअपला चालना
पुण्यात अनेक शैक्षणिक संस्था आहेत. विविध क्षेत्रातील अगदी उत्तम शिक्षण पुण्यात मिळतं. त्यामुळे या तरुणांना कॉलेज करतानाच काम करण्याचीही आवड निर्माण होते. स्टार्टअपच्या माध्यमातून जरा कमी पगार देऊन या शिकाऊ विद्यार्थ्यांकडून चांगलं काम करून घेता येतं. सळसळतं तरुण रक्त असल्याने आपल्यामुळे कंपनीला फायदा झालाच पाहिजे असा विचार तरुणमंडळी करतात. त्यामुळे आपलं कौशल्य पणाला लावून तरुण मंडळी आपल्या कंपनीसाठी नक्कीच भरीव कामगिरी करतील, अशी आशा प्रत्येक व्यावसायिकाला आहे. म्हणूनच पुण्यात तरुणांना अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध असतात.
आणखी वाचा - पुण्यातील स्ट्रीट शॉपिंगसाठी ही ठिकाणं आहेत सर्वात लय भारी
कमी पगारातील कामगार
एखाद्या कंपनीला काय हवं असतं? आपल्या कामगारांनी कमीत कमी पगारात जास्तीत जास्त काम करणं. मगाशीच म्हटल्याप्रमाणे पुण्यात अनेक शैक्षणिक संस्था आहेत. त्यातून अनेक विद्यार्थी कामाच्या शोधात असतात. शिकता शिकताच कामाचा अनुभव घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला जास्त पगाराची गरज नसते. त्यांना केवळ शिकण्याची भूक असते. केवळ पुस्तकी ज्ञान असून उपयोग नाही, त्यासाठी अनुभवही गाठीशी असायला हवा असं आजकाल प्रत्येक क्षेत्रात असल्याने तरुण मंडळी सुरुवातीला कमी पगारात काम करायला तयार होतात. त्याचप्रमाणे कॉलेज करता करताच कामाचा अनुभव मिळाल्याने शिक्षण पूर्ण झाल्या झाल्या त्यांच्यांकडे मोठ्या पगाराची नोकरी मिळू शकते अशी त्यांची धारणा असते. म्हणून अनेक स्टार्टअप कंपन्या अनेक विद्यार्थ्यांना इंटर्नशीप देऊ करतात.
आणखी वाचा - पुण्यातील या नाट्यसंस्था घडवताहेत उद्याचे कलाकार
वर्क फ्रॉम होम
वर्क फ्रॉम होम ही संकल्पना पुण्यात थोड्याफार प्रमाणात रुजते आहे. या संकल्पनेचं महत्त्व आणि ही संकल्पना राबवल्याने कंपनीला होत असलेला फायदा लक्षात घेत अनेक तरुणांनी आपल्या घरातूनच व्यवसाय सुरू केला. पुण्यात अनेक कन्टेंट मॅनेजमेंट फर्म आहेत. अशा अनेक फर्मने ट्रॅफीकमध्ये आपलं अर्ध आयुष्य घालवण्यापेक्षा वर्क फ्रॉम होमची संकल्पना राबवली. त्यामुळे त्यांच्या कामगारांना कामासाठी, कुटूंबासाठी आणि स्वत:साठी चांगला वेळ काढता येतो. कदाचित म्हणून त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे काम होतं.
आणखी वाचा - पुण्यातील ही ठिकाणं ट्रेकींंगसाठी नक्की ट्राय करा
स्टार्टअप कम्यूनिटी
पुण्यात अनेक स्टार्टअप कम्यूनिटी निर्माण झाल्या आहेत. सगळे व्यवसायिक एकत्र येत एकमेकांचे विचार एक्सचेंज केले जातात. त्यामुळे अनेक व्यवसायिकांना आपला व्यवसाय वृद्धींगत करण्यासाठी अनेक कल्पना मिळतात. विचारांचे आदानप्रदान होण्यासाठी अनेक स्टार्टअप कम्यूनिटीही निर्माण झाल्या आहेत. दि पुणे ओपन कॉफी क्लब, टीआयई पुणे, स्टार्टअप सॅटर्डे पुणे, पुणेटेक डॉट कॉम, पुणे कनेक्ट अशा कम्यूनिटींमध्ये व्यवसायिक एकत्र येत आपले विचार मांडतात, त्यामुळे इतरांना प्रेरणा मिळते आणि आपला व्यवसाय पुढे नेण्यास मदत होते.