शाळांमध्ये वाचनकट्टे सुरू
By admin | Published: October 16, 2015 01:11 AM2015-10-16T01:11:10+5:302015-10-16T01:11:10+5:30
माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन जुन्नर शहरातील विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये ‘वाचन प्रेरणा दिवस’ म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.
जुन्नर : माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन जुन्नर शहरातील विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये ‘वाचन प्रेरणा दिवस’ म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी आणि आवड निर्माण व्हावी म्हणून वाचन, संवाद, आत्मचरित्र, कथा यांतून पुस्तकांशी नाळ जोडण्यासाठी विविध कार्यक्रम राबविले गेले. शंकरराव बुट्टे-पाटील विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर जोशी (गाजरे) यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. ए .पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर कार्याध्यक्ष नितीन मेहता व सचिव सुधीर ढोबळे यांच्या हस्ते पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
शंकरराव बुट्टे-पाटील विद्यालयात डॉ. अब्दुल कलाम वाचन कट्टा स्थापन करण्यात आला. त्यानंतर डॉ. कलाम यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे सामूहिक वाचन करण्यात आले. प्रा. बाबा भालवणकर यांचे या वेळी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आनंदाने आणि आवडीने वाचन करावे, यासाठी प्रत्येक वर्गात ‘वाचू आनंदे’ तासिकेचे आयोजन करण्यात आले. रोटरी क्लब आॅफ जुन्नर शिवनेरीने जुन्नर शहरातील सर्व शाळांना शाळेला विद्यार्थ्यांच्या वयाला अनुरूप होतील, अशी पुस्तके भेट दिली. या वेळी रोटरी क्लब आॅफ जुन्नर शिवनेरीचे अध्यक्ष अमोल चंगेडिया, विनायक कर्पे, सचिव बाळासाहेब जाधव, विजय कोल्हे, तुषार लाहोरकर, चेतन शहा, हितेंद्र गांधी आदी उपस्थित होते. त्यानंतर जुन्नर पंचायत समिती व विद्या संस्कार प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जिजामाता सभागृहात कलाम यांच्या जीवनावर आधारित चित्रप्रदर्शन व चित्रफीत प्रदर्शनात शहरातील शंकरराव बुट्टे-पाटील विद्यालय, अण्णासाहेब आवटे विद्यामंदिर, कृष्णराव मुंढे विद्यालय, अंजुमन हायस्कूल, कॉर्नेल मेमोरियल स्कूल या विद्यालयांतील विद्यार्थ्यांनी लक्षणीय सहभाग नोंदविला.