बंधाऱ्यातील गाळ काढण्यास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2016 10:27 PM2016-05-24T22:27:48+5:302016-05-24T23:44:16+5:30
रास्ते सुरेगाव : साठवण क्षमता वाढणार; पिण्याच्या पाण्याची होणार सोय
येवला : तालुक्यात दुष्काळी परिस्थिती सुधारण्याच्या उपाय योजनेचा भाग म्हणून शिवसेनेने कंबर कसली असून, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ आणि पाणी साठवा, जमिनीत पाणी जिरले तरच आपल्याला भविष्य आहे हा दृष्टिकोन ठेवून रास्ते सुरेगाव येथील भागवत वस्तीलगत बंधाऱ्याचा गाळ काढण्याची सुरुवात रविवारी करण्यात आली.
उद्घाटनप्रसंगी शिवसेनेचे संभाजीराजे पवार म्हणाले की, शेतकऱ्यांनी संपूर्णपणे आधुनिक पद्धतीने शेती करावी आणि उपलब्ध पाण्यात कोणते फायदेशीर पीक घेता येईल याचा अभ्यास करावा. तालुक्यात असणाऱ्या अन्य बंधाऱ्याची जागा पाहून आवश्यक त्या ठिकाणी गाळ काढण्याचा उपक्रम चालूच राहणार आहे, असेही पवार यावेळी म्हणाले. बंधाऱ्याचा गाळ काढण्याचा संपूर्ण खर्च शिवसेनेचे संभाजीराजे पवार यांनी सोसला. याबाबत रास्ते सुरेगाव ग्रामस्थांनी त्याचे आभार मानले. यावेळी बापू काळे, कुणाल धुमाळ, रवि काळे, अमोल सोनवणे, बाबासाहेब पवार, विजय पठाडे, गोविंद गायके, राजेंद्र ढमाले, प्रकाश गायके, छगनबाबा मगर, शब्बीर पटेल, कृष्णा कदम, हरिभाऊ भागवत यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार विजय पठाडे यांनी मानले. (वार्ताहर)