कुकडी प्रकल्पातून आवर्तन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:11 AM2021-05-18T04:11:03+5:302021-05-18T04:11:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क घोडेगाव : कुकडी प्रकल्पातून पाणी सोडण्याच्या कालवा सल्लागार समितीच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
घोडेगाव : कुकडी प्रकल्पातून पाणी सोडण्याच्या कालवा सल्लागार समितीच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने सर्व आवर्तने थांबवली होती. आवर्तनाबाबत ज्या लोकांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती, त्यांनी सोमवारी (दि. १७) सुनावणीमध्ये आपल्या याचिका मागे घेतल्या. त्यामुळे कुकडी प्रकल्पातून पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला. लगेचच डिंभे धरण डावा, उजवा कालवा तसेच पिंपळगाव जोगेमधून येडगावमध्ये पाणी घेण्यास सुरुवात झाली आहे.
दि.९ एप्रिल रोजी कालवा सल्लागार समितीची बैठक झाली होती. यामध्ये पिंपळगाव जोगे धरणाच्या डेड स्टॉकमधून तीन टीएममसी पाणी घ्यायचा निर्णय झाला होता. यावर प्रशांत औटी या याचिकाकर्त्यांनी मुंबई न्यायालयात अपील केले. पुढच्या वर्षी पाऊस झाला नाही तर आम्हाला पाणी कमी पडते. यासाठी पिंपळगाव जोगेच्या डेड स्टॉकमधून पाणी उचलू नये, असे म्हणणे त्यांनी न्यायालयात मांडले.
यावर दि.६ मे रोजी सुनावणी झाली. यामध्ये कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या सर्व निर्णयाला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे कुकडी प्रकल्पातून सुरू असलेली सर्व आवर्तने थांबली. कुकडी प्रकल्पात पाणी असतानाही शेतकऱ्यांना पाणी मिळत नव्हते. कुकडी कालव्यावरील आवर्तन, उजवा कालवा, कुकडी, घोड व मीना नदीचे आवर्तन शिल्लक होते, मात्र न्यायालयाच्या स्थगितीमुळे सर्व आवर्तने बंद करण्यात आली.
प्रशांत औटी यांच्या याचिकेबरोबरच श्रीगोंदा तालुक्यातील अजून काही लोकांनी आवर्तनबाबत वेगळ्याने आपले म्हणणे न्यायालयात मांडले. या सर्व अपिलांवर सोमवारी (दि. १७) सुनावणी होणार होती. यामध्ये दाखल केलेल्या सर्व याचिकाकर्त्यांनी आपल्या याचिका मागे घेतल्याने या सर्व रद्द दाखल करण्यात आल्या.
चौकट
सोमवारी सायंकाळी डिंभे धरण डावा व उजवा कालवा सुरू करण्यात आला. तसेच पिंपळगाव जोगेमधून येडगावमध्ये पाणी घेण्यास सुरवात झाली आहे. येडगावमध्ये मुबलक पाणी आल्या बरोबर दोन ते तीन दिवसांत कुकडी डावा कालव्याचे आवर्तन सुरू केले जाणार असल्याचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांनी सांगितले.
17052021-ॅँङ्म-ि05 - डिंभे धरण