"नाट्यगृह सुरु करा, कलाकारांना न्याय द्या", अशा घोषणाबाजीत पुण्यात रंगकर्मींचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 03:15 PM2021-08-09T15:15:49+5:302021-08-09T15:15:57+5:30
कोरोना महामारीमुळे गेल्या दीड वर्षांपासून विविध क्षेत्रातील रंगकर्मींचे प्रचंड हाल
पुणे : नाट्यगृह चालू झालीच पाहिजेत, कलाकारांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी घोषणाबाजी करत पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रंगकर्मींनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. यावेळी आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाही काढण्यात आला.
कोरोना महामारीमुळे गेल्या दीड वर्षांपासून विविध क्षेत्रातील रंगकर्मींचे प्रचंड हाल झाले आहेत. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. जनसामान्यांना मनोरंजनातून निखळ आनंद देणाऱ्या या कलाकारांकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यांना जागे करण्यासाठी रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्र यांनी सोमवारी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
यावेळी कलाकारांनी गाण्यावर नृत्य करत आंदोलनाला सुरुवात केली. कलाकारांच्या सर्व मागण्या सरकार समोर ठेवून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हे आंदोलन एकाच वेळीस झाले आहे.
सिनेमा, मालिका, नाटक क्षेत्रातील कलाकारांबरोबरच तमाशा, भजन, कीर्तन, गोंधळ, पोवाडा, लावणी, लोककला सादर करणाऱ्या रंगकर्मींचाही या आंदोलनात सहभागी झाले होते. कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठीच्या मागण्या या आंदोलनातून सरकारपुढे मांडण्यात आल्या आहेत. तमाशा महामंडळ, मुक्तांगण परिवार, जादूगार संघटना, महाक्रांती चित्रपट संघटना इत्यादी संघटनांनी रंगकर्मी आंदोलनाला पाठिंबा दिला.
आंदोलनातील त्वरित मागण्या
- एक, दोन किंवा अतिशय कमी कलाकारांना घेऊन जे लोक कलावंत आपली कला दाखवून गुजराण करतात. त्यांना आपली कला सर्वत्र सादर करण्याची व त्यासाठी प्रवासाची परवानगी मिळावी.
- चित्रीकरण, थिएटर व सांस्कृतिक कार्यक्रम त्वरित पूर्ववत सुरु करावेत.
- शासनाने कलाकारांच्या मुलांना शाळेत विना फी प्रवेश द्यावा
- महाराष्ट्रातील कलाकारांना रंगकर्मी रोजगार हमी योजना लागू करावी
- कोरोना काळात परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत शासनाने प्रत्येक कलाकारास दरमहा ५ हजार रुपये द्यावेत
- मराठी चित्रपटांना त्वरित अनुदान मिळावे