Pune Rain: पुण्यात पावसाची दमदार 'बॅटिंग'! शनिवारपासून जोरदार सुरु, धरणातील पाणीसाठ्यात वाढ
By श्रीकिशन काळे | Published: July 14, 2024 12:09 PM2024-07-14T12:09:16+5:302024-07-14T12:10:35+5:30
Pune Rain शनिवारपासून संततधार पावसामुळे पुणेकरांनी या पावसाळ्यात प्रथमच दिवसभर सरींचा आनंद घेतला
पुणे : अनेक दिवसांनंतर पावसाने शनिवार आणि रविवारी सकाळी दमदार बॅटिंग केली. दिवसभर संततधार आणि शनिवारी रात्री सुद्धा मध्यम सरी कोसळल्या असून रविवार सकाळपर्यंत पाऊस सुरु होता. कारण धरणक्षेत्रातही चांगला पाऊस झाला. या हंगामातील शनिवारचा पाऊस सर्वाधिक आणि आनंद देणारा ठरला. लोणावळ्यात तर २४१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस जिल्ह्यात सर्वत्र पडला. त्यामुळे शेतकरीराजाही खूष झाला. खडकवासला धरण प्रकल्पात १ टीएमसीने वाढ झाली आहे. (Pune Rain)
दोन दिवसांपासून मॉन्सून सक्रिय झाला आहे. त्यामुळे राज्यासह पुणे जिल्ह्यात पावसाची हजेरी लागत आहे. शनिवारी देखील दिवसभर पावसाची हजेरी होती. दरम्यान घाटमाथ्यावरही चांगला पाऊस होत आहे. शनिवारी (दि. १३) जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. घाटमाथ्यावर तर मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
शनिवारी सकाळपासूनच शहरात वरूणराजाने हलक्या ते मध्यम सरींची बरसात केली. तर संपूर्ण जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. संततधार पावसामुळे पुणेकरांनी या पावसाळ्यात प्रथमच दिवसभर सरींचा आनंद घेतला. संततधार असल्याने कुठेही पूर आल्याची परिस्थिती दिसून आली नाही. गेल्या २४ तासांत आज सकाळी ८.३० पर्यंत लोणावळ्यात सर्वाधिक २४१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच शिवाजीनगरला ३७ मिमी पाऊस नोंदवला गेला.
मॉन्सूनची आस असलेला कमी दाबाचा पट्टा काहीसा दक्षिणेकडे सरकला आहे. राजस्थानच्या श्री गंगानगरपासून हिस्सार, दिल्ली, बाराबंकी, देहरी, असनसोल ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. उत्तर गुजरात आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.
तसेच महाराष्ट्रापासून उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे पुढील तीन-चार दिवस पावसाचे असणार आहेत. पुढील आठवड्यात संततधार पाऊस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
पुण्यातील २४ तासांतील पाऊस
लोणावळा : २४१.५ मिमी
लवासा : १६० मिमी
माळिण : ७७.५ मिमी
एनडीए : ५६.५ मिमी
पाषाण : ३८.५ मिमी
शिवाजीनगर : ३७ मिमी
खेड : ५३ मिमी
चिंचवड : ३० मिमी
बारामती : १२.८ मिमी
वडगावशेरी : १९.५ मिमी
दापोडी :: १९.५ मिमी
हडपसर : २७.५ मिमी
बालेवाडी : १७.५मिमी
मगरपट्टा : १४ मिमी
कोरेगाव पार्क : ०.५ मिमी
माॅन्सून सक्रिय असल्याने चांगला पाऊस होत आहे. गेल्या आठवड्यात पावसाने ओढ दिली होती. पण आता त्याने जोर पकडला आहे. येत्या आठवड्यातही चांगल्या पावसाचा अंदाज आहे. पुण्यात दोन दिवस संततधार पडत असल्याने धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. -डाॅ. अनुपम कश्यपी, माजी प्रमुख, भारतीय हवामानशास्र विभाग, पुणे