‘थर्ड पार्टी कंपनी’बरोबर करारास पुणे पालिकेची सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 12:36 PM2020-02-04T12:36:07+5:302020-02-04T12:45:33+5:30
महापालिकेच्या सभागृहात तक्रार करण्यात आलेल्या काही कंपन्या यात पुन्हा उतरल्या असल्याची माहिती
पुणे : पालिकेच्या विकासकामांची तटस्थ यंत्रणेकडून (थर्ड पार्टी इन्स्पेक्श्न) तपासणी करण्यासाठी अशा कंपन्यांबरोबर करार करण्यास क्षेत्रीय कार्यालयांनी सुरुवात केली आहे. ढोले-पाटील रस्ता तसेच सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाने असा करार केला आहे. सर्वसाधारण सभेत तक्रार झालेल्या काही कंपन्यांनाही यात सामावून घेतले जात असल्याची चर्चा आहे.
रस्त्यांचे डांबरीकरण, काँक्रिटीकरण, पदपथांची दुरुस्ती, गटारे, नाली, विरंगुळा केंद्र अशा कामांमध्ये दर्जा ठेवला जावा, यासाठी पालिकेकडून अशा कामांचे थर्ड पार्टी इन्स्पेक्शन केले जाते. काम योग्य असल्याचे अशा कंपनीचे प्रमाणपत्र असल्याशिवाय ठेकेदार कंपनीला बिल दिले जात नाही. त्यासाठी या कंपन्यांना कामाच्या एकूण खर्चाच्या २ टक्के रक्कम पालिकेकडून मानधन दिले जाते. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांना अशा कंपन्या नियुक्त करून दिल्या जातात व त्यांच्याकडून कामाची तपासणी करून घ्यावी, असे सांगितले जाते.
या कंपन्यांच्या कामांबाबत तक्रारी आल्याने मागील दोन वर्षे ही तपासणीची पद्धत बंद करण्यात आली होती. त्यामुळे आता क्षेत्रीय कार्यालयांनी त्यांच्याबरोबर कनेक्ट असलेल्या जुन्याच कंपन्यांबरोबर लगेचच करार करण्यास सुरुवात केली आहे.
महापालिकेच्या सभागृहात तक्रार करण्यात आलेल्या काही कंपन्या यात पुन्हा उतरल्या असल्याची माहिती मिळाली. नगरसेवक अविनाश बागवे यांनी एका कंपनीबाबत थेट सभागृहातच पुराव्यानिशी आरोप केले होते. एका अधिकाऱ्याच्या निकटच्या नातेवाईकाचीच ही कंपनी असून त्यांनी दिलेल्या प्रमाणपत्रात व संबंधित कामात तफावत असल्याचे सभागृहात उघड झाले होते. त्यावरून त्या कंपनीची चौकशीही करण्यात आली होती. आता पुन्हा तीच कंपनी या स्पर्धेत असून त्यांना काम देण्याचा प्रयत्न होत असल्याचे समजते.
......
पद्धतच चुकीची
जे काम पालिकेच्या अभियंत्यांनी करणे अपेक्षित आहे त्या कामासाठी २ टक्के मानधन देऊन स्वतंत्र कंपनी नियुक्त करणेच चुकीचे आहे. या कंपन्या नियुक्त करण्याचे निकष, त्यांची कार्यक्षमता, त्यांच्याकडे तज्ज्ञ आहे की नाही, तपासणी खरोखरच केली जाते की नाही, याबाबत सगळेच अनभिज्ञ असतात. - अविनाश बागवे, नगरसेवक, काँग्रेस.
............
स्वतंत्र पथक स्थापणार
ही पद्धत पुन्हा सुरू करण्याबाबत पालिकेच्या दक्षता विभागाचे उपायुक्त राजेंद्र मुठे म्हणाले, की आयुक्तांनी कंपन्यांना कामाची चौकट तर ठरवून दिली आहे. शिवाय आयुक्तस्तरावर एक स्वतंत्र पथक यासाठी स्थापन करण्यात येत आहे. त्यात पालिकेतील तज्ज्ञ अधिकारी असतील. हे पथक त्या कंपन्यांनी दिलेल्या एखाद्या कामाचे प्रमाणपत्र व ते काम याची अचानक तपासणी करतील. त्यात काही तफावत आढळली तर त्या कंपनीला त्वरित काळ्या यादीत टाकले जाईल. हे पथक लवकरच कार्यरत होणार आहे.