विश्वकोश अद्ययावतीकरणाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 01:55 PM2018-03-15T13:55:05+5:302018-03-15T16:34:10+5:30

सर्व विषय आणि ज्ञानशाखेतील झालेल्या बदलांची नोंद घेऊन विश्वकोशामध्ये सुधारणा करण्यासाठी शासनाने हे पाऊल उचलले आहे.

Starting the Encyclopedia Updation | विश्वकोश अद्ययावतीकरणाला सुरुवात

विश्वकोश अद्ययावतीकरणाला सुरुवात

Next
ठळक मुद्दे२३ पैकी २० खंड प्रकाशित : ४६ ज्ञान मंडळांकडून ८५० नव्या नोंदीविविध विषयांशी संबंधित ज्ञान मंडळे स्थापन करण्याचा शासनातर्फे निर्णय

पुणे : विश्वकोशातील नोंदी कालबाह्य झाल्याने या नोंदींमध्ये सुधारणा करण्याबरोबरच मानव्यशाखांमधील नवीन संकल्पना, विचारप्रवाह या सर्व बदलांची नोंद घेण्यासाठी विश्वकोश अद्ययावतीकरणाच्या कामास सुरुवात झाली आहे. त्यासाठी राज्य मराठी विश्वकोशनिर्मिती मंडळाकडून राज्यभरातील विविध विद्यापीठे, शैक्षणिक व संशोधन संस्थांमध्ये ४६ ज्ञान मंडळे स्थापन करण्यात आली असून, ज्ञान मंडळाकडून आजमितीला विज्ञान व मानव्यशाखेमधील नव्याने ८५० नोंदी केल्या आहेत .
सद्य:स्थितीत मराठी विश्वकोशाच्या २३ खंडांपैकी २० खंड प्रकाशित झाले आहेत. हे खंड पूर्ण करण्यास लागलेल्या प्रदीर्घ कालावधीमुळे विश्वकोशातील अनेक नोंदी या कालबाह्य झाल्या आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नवनवीन संशोधनामुळे मोठ्या प्रमाणावर भर पडली असून, नव्या संकल्पना विचारप्रवाह पुढे आले आहेत. त्यामुळे सर्व विषय आणि ज्ञानशाखेतील झालेल्या बदलांची नोंद घेऊन विश्वकोशामध्ये सुधारणा करण्यासाठी शासनाने हे पाऊल उचलले आहे. हे अद्ययावतीकरण करताना विश्वकोशाचा मूळ दर्जा कायम ठेवून माहिती व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सर्व ज्ञान क्षेत्रातील माहिती एकाच वेळी उपलब्ध करून त्याचे समीक्षण-संपादन करून अंतिम नोंद करणे आवश्यक वाटत असल्याने विविध विषयांशी संबंधित ज्ञान मंडळे स्थापन करण्याचा निर्णय शासनातर्फे घेतला. त्यानुसार मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, लॉ कॉलेज पुणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ, रचना संसद, गायन समाज देवल क्लब, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, प्रभात चित्र मंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषद, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, रसायन तंत्रज्ञान संस्था, मराठी विज्ञान परिषद, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,  अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे, विश्वेश्वरय्या प्रौद्योगिकी संस्थान नागपूर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, अमरावती विद्यापीठ, विज्ञान भारती अशा विद्यापीठांमध्ये व शैक्षणिक-संशोधन संस्थांमध्ये सुमारे ४६ ज्ञान मंडळे स्थापन केली आहेत. या ज्ञान मंडळांचे मानव्यविद्या व विज्ञान व तंत्रज्ञान शाखा असे दोन विभाग केलेले असून, निर्मिती मंडळातील सदस्य त्यांच्याशी संबंधित विषयांच्या ज्ञान मंडळांचे विषय पालक म्हणून काम पाहतात. डॉ. गौरी माहुलीकर, डॉ. अरुणा ढेरे, डॉ. नीरज हातेकर, डॉ. बाळ फोंडके, डॉ. सुहास बहुलकर, मेजर जनरल शशिकांत पित्रे असे विषयतज्ज्ञ  मराठी विश्वकोशाच्या सदस्यपदी लाभले असून, अनेक ज्ञान मंडळांचे पालकत्व यांच्याकडे सुपूर्द केले आहे.विश्वकोशीय लेखनाची पद्धत व मांडणी ज्ञान मंडळांतील लेखकांपर्यंत पोहोचून त्यांना अधिक प्रभावीपणे  नोंद-लेखन करता यावे, यासाठी नोंदलेखन कार्यशाळांचे विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांच्या सहयोगाने केले जाते. आपल्या विषयाशी निगडित विश्वकोशामध्ये विषयांच्या अनुषंगाने नवीन नोंदींचे भर घालणे अशा स्वरुपात ज्ञान मंडळे कार्य करतात. राज्य मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष डॉ. दिलीप करंबळेकर म्हणाले, विश्वकोशातील विषय हा सामान्य वाचक, विद्यार्थी, जिज्ञासू यांपर्यंत समर्पक आणि सोप्या भाषेमध्ये पोहोचावा, याची काळजी विश्वकोश आणि ज्ञान मंडळे घेतात. नोंदींचे लेखन, समीक्षण-संपादन आणि प्रकाशन या पूर्ण प्रक्रियेला ज्ञान मंडळांच्या स्थापनेमुळे अधिक गती प्राप्त झाली आहे.राज्य मराठी विश्वकोशनिर्मिती मंडळ ज्ञान मंडळांनी आपल्या विषयांतर्गत कोणत्या नोंदी येतील, याची सविस्तर नोंद यादी तयार केलेली असून, या यादीनुसार नोंदींचे लेखकांमध्ये वाटप होते. लिहिलेल्या नोंदींवर आशय व भाषेच्या दृष्टीने संस्करण होऊन नोंद अंतिम केली जाते. 

...............................
ज्ञान मंडळांमध्ये व विश्वकोशामध्ये होणाºया नोंदींचे प्रकाशन त्या-त्या ज्ञान मंडळांच्या संकेतस्थळांवर होणार असून, या संकेतस्थळांची निर्मिती प्रक्रियाधीन आहे. संकेतस्थळांवर ज्ञान मंडळांची प्रस्तावना, विषयांतील घटकांप्रमाणे होणारी वर्गवारी आणि शोध अशा रुपात ज्ञान मंडळे लोकांसमोर येतील. त्यादृष्टीने ज्ञान मंडळांनी प्राथमिक तयारी केलेली आहे.
-  डॉ. दिलीप करंबळेकर, अध्यक्ष, 

Web Title: Starting the Encyclopedia Updation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.