आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेला आजपासून सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 07:36 AM2018-05-31T07:36:26+5:302018-05-31T07:36:26+5:30
राज्य मंडळाचा बारावीचा निकाल बुधवारी जाहीर होताच शहरातील काही महाविद्यालयांच्या आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला गुरुवारपासूनच सुरुवात होणार आहे.
पुणे : राज्य मंडळाचा बारावीचा निकाल बुधवारी जाहीर होताच शहरातील काही महाविद्यालयांच्या आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला गुरुवारपासूनच सुरुवात होणार आहे. काही महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाल्यानंतर प्रवेश दिले जाणार आहेत. त्या त्या महाविद्यालयांमध्ये बारावीत शिकलेल्या विद्यार्थ्यांना नियमानुसार वरिष्ठ महाविद्यालयातील प्रवेशासाठी प्राधान्य असणार आहे.
शहरातील प्रमुख वरिष्ठ महाविद्यालयांमधील बीए, बीकॉम, बीएस्सी व इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेला लगेचच सुरुवात होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून अनेक महाविद्यालयांनी आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे. त्या त्या महाविद्यालयांच्या संकेतस्थळावर आॅनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रवेशाबाबतची सविस्तर माहितीही संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्यानंतर गुणवत्ता यादीनुसार प्रवेश दिले जाणार आहे. बारावीचा निकाल आॅनलाइन जाहीर करण्यात आला असून, त्यांना येत्या १२ जून रोजी गुणपत्रिका दिल्या जाणार आहेत. प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेसह इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रती महाविद्यालयामध्ये जमा कराव्या लागतील.
फर्ग्युसन महाविद्यालयांच्या विविध शाखांसाठी आॅनलाइन अर्ज भरण्याची सुविधा महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे अर्ज आल्यानंतर पहिल्यांदा एक जनरल लिस्ट लावली जाईल. या यादीबाबत विद्यार्थ्यांचे काही आक्षेप असल्यास ते नोंदविण्याची संधी त्यांना दिली जाईल. त्यानंतर गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.
येत्या सोमवारपासून आॅनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रवेश समितीच्या बैठकीमध्ये प्रवेशाबाबतचे सविस्तर वेळापत्रक निश्चित केले जाईल. त्यानुसार संकेतस्थळावर त्याबाबतची माहिती उपलब्ध करून दिली जाईल.
- दिलीप सेठ, प्राचार्य स. प. महाविद्यालय
आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी येत्या दोन दिवसांत लिंक उपलब्ध करून दिली जाईल. आॅनलाइन अर्ज जमा झाल्यानंतर पहिली, दुसरी, तिसरी अशा गुणवत्ता यादी जाहीर केल्या जातील.
- चंद्रकांत रावळ,
प्राचार्य, बीएमसीसी महाविद्यालय
मॉडर्न महाविद्यालयातून बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ३१ मे ते ४ जून २०१८ पर्यंत मुदत दिली जाईल. त्यानंतर इतर महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. - राजेंद्र झुंजारराव, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय शिवाजीनगर
प्रवेश परीक्षांच्या निकालांची प्रतीक्षा
इंजिनिअरिंग, वैद्यकीय, फार्मसी, कृषी, वास्तुविशारद आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जेईई अॅडव्हान्स, सीईटी, नीट आदी प्रवेश प्रक्रिया पार पडल्या आहेत. या परीक्षांच्या निकालानंतर त्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियांना सुरुवात होणार आहे. बारावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांचे लक्ष प्रवेश परीक्षांच्या निकालाकडे लागले आहे. या निकालावर त्यांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीचा प्रवेश निश्चित होणार आहे.
गरवारे महाविद्यालयाचे अर्ज संकेतस्थळावर उपलब्ध
गरवारे महाविद्यालयाच्या प्राचार्य मुक्तजा मठकरी यांनी सांगितले, ‘बीए व बीएस्स्सी प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी संकेतस्थळावर आॅनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात आला
आहे. नियमानुसार गरवारे महाविद्यालयात बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्राधान्य असेल. त्याचबरोबर इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या बीए प्रथम वर्ष प्रवेशासाठी ५५ टक्के, तर बीएस्सी प्रथम वर्ष प्रवेशासाठी ६० टक्के गुणांची अट ठेवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाल्यानंतर प्रवेशाला सुरुवात करण्यात येणार आहे.’