माळशेज घाटात दुरुस्तीचे काम सुरू
By admin | Published: April 27, 2017 04:42 AM2017-04-27T04:42:15+5:302017-04-27T04:42:15+5:30
माळशेज घाटात सध्या धोकादायक दरडींना जाळ्या लावण्याचे, संरक्षक भिंतींचे आणि रस्ता काँक्रिटीकरणाचे काम वेगात सुरू आहे
खोडद : माळशेज घाटात सध्या धोकादायक दरडींना जाळ्या लावण्याचे, संरक्षक भिंतींचे आणि रस्ता काँक्रिटीकरणाचे काम वेगात सुरू आहे, माळशेज घाटातील वाहतूक कधीपासून बंद ठेवायची, याबाबत निश्चित नसल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे स्थापत्य अभियंता एस. के. चौधरी यांनी सांगितले.
माळशेज घाट हे मुसळधार पावसाचे आगार मानले जाते. माळशेज घाट आणि परिसरात दरवर्षी पावसाळ्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस होतो. मागील वर्षी २०१६ मध्ये जुलै महिन्यात माळशेज घाटात ४ ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या, करंजाळे गावच्या हद्दीत एक डोंगरकडा कोसळला होता, तर आॅगस्ट महिन्यात करंजाळे गावाजवळ नगर- कल्याण महामार्गावर डांबरी रस्ता खचला होता.
दरडी आणि डोंगरकडे कोसळण्याच्या घटनेत सुदैवाने मोठा अपघात किंवा मोठी दुर्घटना झाली नव्हती, मात्र या काळात घाटातून वाहतूक करण्यास मोठा अडथळा निर्माण झाल्याने माळशेज मार्गे होणारी वाहतूक बंद करण्यात आली होती.
सन २०१६ पासून राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने माळशेज घाटात घाटदुरुस्तीचे काम सुरू आहे. यापूर्वी घाटात अनेक ठिकाणी धोकादायक दरडींच्या ठिकाणी लोखंडी जाळ्या लावण्यात आल्या आहेत. सध्या माळशेज घाटात धबधब्यांचे पाणी ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पडते तसेच ज्या ज्या ठिकाणी रस्ता वारंवार उखडला जातो अशा ठिकाणी काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात येणार आहे.
घाटात काँक्रिटीकरणाचा १७० मीटर लांबीचा रस्ता ठिकठिकाणी करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी दरडी कोसळण्याची मोठी शक्यता आहे अशा ठिकाणी लोखंडी जाळ्या लावण्यात आल्या आहेत. घाटाच्या एका बाजूला असणाऱ्या खोल दरीमुळे अपघात होऊ नयेत, अशा धोकादायक ठिकाणी काँक्रिटीकरणाच्या संरक्षक भिंती बांधण्यात येत आहेत. घाटात दुरुस्ती व संरक्षणात्मक काम करण्यासाठी २ क्रेन, ३ पोकलँड, २ जेसीबी, ४ ट्रॅक्टर, २ रोलर आदी यंत्रसामग्री कार्यरत आहे.