आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात
By Admin | Published: October 26, 2016 05:57 AM2016-10-26T05:57:02+5:302016-10-26T05:57:02+5:30
विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बुधवारपासून (दि. २६) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. जिल्हाधिकारी सौरभ राव
पुणे : विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बुधवारपासून (दि. २६) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. जिल्हाधिकारी सौरभ राव मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी असून, राजेंद्र मुठे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार असून, जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.
अद्याप एकाही पक्षाने आपला अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही. कॉँग्रेस-राष्ट्रवादी किंवा शिवसेना-भाजपा युती होणार किंवा नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यामुळे सध्या या चारही पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये विधान परिषदेसाठी नवीन चेहरा देण्याची जोरदार मागणी होत आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून विद्यमान आमदार अनिल भोसले, जालिंदर कामठे, प्रदीप कंद, प्रकाश म्हस्के, आझम पानसरे, विलास लांडे, महापौर प्रशांत जगताप, अप्पा रेणुसे इच्छुक आहेत. काँग्रेसमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि अरविंद शिंदे यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. भाजपामध्ये बापू भेगडे आणि गणेश बिडकर, अशोक येनपुरे हे इच्छुक आहेत. (प्रतिनिधी)
- आमदार अनिल भोसले यांचा सहा वर्षांचा कार्यकाल ५ डिसेंबर
रोजी संपत आहे. त्यामुळे ही निवडणूक होत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांतील नगरसेवक मतदार आहेत. २६ ते २ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणे, ३ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी, ५ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. १९ नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. मतदान झाल्यानंतर २२ नोव्हेंबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.