Lumpy Virus: राज्य पशुसंवर्धन मंत्र्यांच्या नगर जिल्हयालाच लंपीचा फटका; तेरा गुरांचे बळी
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: September 11, 2022 06:16 PM2022-09-11T18:16:25+5:302022-09-11T18:17:47+5:30
लंपी रोग या गाई-म्हशींना होणा-या विषाणूजन्य रोगाची साथ सध्या उत्तर भारतातील राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियानासह अनेक राज्यात पसरली आहे
पुणे : लंपी या जनावरांच्या गुरांच्या आजाराचा तडाखा हा जळगावपाठाेपाठ राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नगर जिल्हयाला बसला आहे. जळगावमध्ये आतापर्यंत १६ जनावरे दगावले असून त्यापाठापाठ नगरमध्ये १३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. लंपी हा संकरित गायींना जास्त हाेताे व नगरमध्ये संकरित गायींची संख्या जास्त असल्याने ही संख्या वाढल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.
राज्यात सर्वप्रथम दि. ४ ऑगस्टला जळगाव जिल्ह्यातील रावेर तालूक्यातील चिनावल या गावामध्ये लंपी ची लागण झाली. त्यानंतर हा राेग झपाटयाने अहमदनगर, धुळे, अकोला, पुणे, लातूर, औरंगाबाद, बीड, नाशिक व एकुण १९ जिल्ह्यांमध्ये पोहोचला. अकरा सप्टेंबर अखेर एकूण ३१० गावांमध्ये २३८७ गुरांना बाधा झाली असून त्यापैकी २ हजार बरे झाले आहेत. तर जळगाव जिल्ह्यातील १६, अहमदनगर १३, अकोला १, पुणे ३, बुलढाणा ३ व अमरावती ३ वाशिम व धुळे प्रत्येकी एक अशा एकूण ४१ बाधित पशुधनाचा मृत्यू झाला आहे.
लंपी रोग या गाई-म्हशींना होणा-या विषाणूजन्य रोगाची साथ सध्या उत्तर भारतातील राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियानासह अनेक राज्यात पसरली आहे. तेथे हजारो जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. तेथे गुरांच्या किंमती कमी झाल्याने तेथूनच व्यापा-यांंनी महाराष्ट्रात बाधित गुरे आणल्याने ही साथ महाराष्ट्रात झपाटयाने पसरली आहे. आता ही साथ आणखीनच तीव्र हाेत असून दरराेज चार ते पाच पशुधनांचा बळी जात आहे.
पशुसंवर्धन विभागाकडून याबाबत सुरूवातीपासूनच आवश्यक ती खबरदारी घेतल्यामुळे महाराष्ट्रातील लंपी रोगामुळे मृत्यूदराचे प्रमाण कमी राखण्यामध्ये आल्याचा दावा केला आहे. बाधित क्षेत्राच्या ५ किमी परिघातील १०७२ गावातील ३ लाख ६७ हजार ६८० पशुधनास लसीकरण करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दि. ८ सप्टेंबर रोजी जळगाव, अकोला व औरंगाबाद जिल्ह्यातील लंपी चर्म रोगाने बाधित गावांचा दौरा करून आढावा घेतला. या अधिकाऱ्यांनी शेतक-यांमध्ये मोठ्याप्रमाणात जनजागृती करावी तसेच निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. मात्र आता त्यांना नगरकडे जास्त लक्ष दयावे लागणार आहे.
गुरांच्या बाजारावर बंदी
महाराष्ट्र राज्य लंपी चर्म रोगाच्या बाबतीत “नियंत्रित क्षेत्र” म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार गाय व म्हैस प्रजातीची नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे. तसेच गो व म्हैस प्रजातीचा बाजार भरविणे, शर्यती, प्राण्यांच्या जत्रा, प्रदर्शने इ. बाबींस मनाई करण्यात आली आहे.
खासगी पशुवैद्यकांची चांदी
लंपी बाधित पशुधनासाठी खासगी गुरांचे डाॅक्टर महागडी प्रतिजैविके आणि इतर औषधे लिहून देत असल्याच्या तक्रारी शेतक-यांनी पशुसंवर्धन आयुक्तांकडे केल्या आहेत. यासाठीचे सर्व आवश्यक औषधे, शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यांत पुरेशी उपलब्ध आहेत. शेतक-यांनी त्यांच्या बाधित पशुधनासाठी त्यांच्या दारात मोफत उपचार घ्यावेत. तसेच या रोगाची लक्षणे दिसल्यास जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने / पशुधन विकास अधिकाऱ्यांना माहिती देऊन उपचार करून घ्यावे, असे अवाहन केले आहे.
मदतीसाठी काॅल सेंटर
मदतीसाठी पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्र.१८००-२३३०-४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र.१९६२ तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन केले.