राज्याचा अर्थसंकल्प : पुणे मेट्रोसाठी मिळणार ४५ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 05:41 AM2018-03-10T05:41:17+5:302018-03-10T05:41:17+5:30
राज्याच्या अर्थसंकल्पातून पुण्यासाठी फार मोठा फायदा दिसत नसला तरी दोन मोठ्या प्रकल्पांसाठी मात्र तरतूद करण्यात आली आहे. पुणे मेट्रोसाठी ४५ कोटी रुपये मिळणार असून, राज्यातील ८ स्मार्ट सिटीसाठी १ हजार ३०० कोटी रुपये ठेवण्यात आले आहेत; मात्र त्याचे वर्गीकरण दिलेले नाही.
पुणे : राज्याच्या अर्थसंकल्पातून पुण्यासाठी फार मोठा फायदा दिसत नसला तरी दोन मोठ्या प्रकल्पांसाठी मात्र तरतूद करण्यात आली आहे. पुणे मेट्रोसाठी ४५ कोटी रुपये मिळणार असून, राज्यातील ८ स्मार्ट सिटीसाठी १ हजार ३०० कोटी रुपये ठेवण्यात आले आहेत; मात्र त्याचे वर्गीकरण दिलेले नाही.
मेट्रोसाठी नागपूर व पुणे असे दोन्ही प्रकल्प मिळून ९० कोटी रुपयांची तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात आहे. त्यामुळे त्यातील ४५ कोटी रुपये पुण्याला मिळणे अपेक्षित आहे. मात्र केंद्र सरकारची नागपूर मेट्रोवर विशेष मेहेरनजर आहे. याधीही त्यांच्यासाठी जास्त तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे त्यांचे कामही पुणे मेट्रोपेक्षा जास्त लवकर सुरू झाले व आता लवकरच मेट्रोची दुसरी चाचणीही घेण्यात येणार आहे.
त्या तुलनेत पुण्याच्या मेट्रोचे काम मात्र संथपणे सुरू असल्याची टीका होत आहे. तरीही आता थेट ४५ कोटी रुपये मिळणार असल्याने कामाला गती येईल, असे दिसते आहे. नागपूर मेट्रोची चाचणी होत असताना पुणे मेट्रोचे मात्र अद्याप खांबही जमिनीतून वर येण्यास तयार नाहीत असे बोलले जाते. त्यामुळे महामेट्रो कंपनीने आता पुण्यातील मेट्रोच्या कामाची गती वाढवली आहे.
तरतुदीतील अधिक निधी मिळण्याची शक्यता
देशात दुसºया क्रमांकावर आलेल्या पुणे शहरासह राज्यात एकूण ८ स्मार्ट सिटी आहेत. ही प्रक्रिया अजूनही सुरू राहणार आहे. त्यासाठी १ हजार ३०० कोटी रुपयांची तरतूद आहे. या निधीचे वर्गीकरण देण्यात आलेले नाही; मात्र पुणे शहराची लोकसंख्या व स्मार्ट सिटी योजनेतंर्गत केलेले काम यामुळे पुण्याच्या वाट्याला यातून जास्त निधी मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.