उरळी कांचन येथील दारु भटट्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 04:08 PM2018-03-02T16:08:26+5:302018-03-02T16:08:26+5:30
हवेली तालुक्यातील शिंदवणे व सोरतापवाडी परिसरातील अनाधिकृत गावठी दारूभट्ट्यांवर दारु भटट्यांवर राज्य शुल्क विभागाच्या अधिकाºयांनी छापा टाकण्यात आला. ही कारवाई बुधवारी (दि.२८) रोजी मध्यरात्री करण्यात आली.
उरळी कांचन येथील दारु भटट्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा
उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील शिंदवणे व सोरतापवाडी परिसरात अनाधिकृत गावठी दारूभट्ट्यांवर राज्य शुल्क विभागाच्या वतीने छापा टाकण्यात आला. त्यात १७ हजार १५० लिटर तयार दारू,४३ हजार लिटर दारू तयार करण्याचे रसायन ,१० वाहने व इतर साहित्य असा एकूण २२ लाख ४८ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी (दि.२८) रोजी मध्यरात्री करण्यात आली.
गेल्या काही वर्षात जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात गावठी दारू साठा जप्त करण्यात आला आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनी एक वर्षापूर्वी पदभार स्वीकारल्यानंतर प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मटका, जुगार, दारू इत्यादी अवैध धंदे बंद करण्याचे आदेश स्थानिक पोलिसांना दिले होते. त्या आदेशानुसार, ग्रामीण पोलिसांनी आपापल्या हद्दीतील अवैध धंदे बंद झाल्याचा लेखी अहवाल पोलीस अधिक्षकांना दिले होते. मात्र, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने बुधवारी करण्यात आलेल्या कारवाईने पोलीस अधिकाºयांनी पाठविलेला लेखी अहवालात त्रुटी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
हवेली तालुक्याच्या पूर्व भागात शिंदवणे व सोरतापवाडी गावांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर गावठी दारू तयार केली जात असल्याची खात्रीशीर माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्याआधारे पुणे विभागीय उपायुक्त अर्जुन ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने बुधवारी या ठिकाणांवर कारवाई करीत मोठा साठा हस्तगत केला.
या कारवाईमध्ये पाच ठिकाणी दारू भट्ट्या सुरु होत्या. पोलीस आल्याचे पाहून भट्टी मालक व भट्टीवर काम करणारे कामगार अंधाराचा फायदा घेवून पसार झाले. याठिकाणी ३५ लिटरचे ५४ कॅन व ४३ हजार लिटर रसायन आणि मळीने भरलेले बॅरल आढळून आले. मात्र , दारूच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणाºया ५ दुचाकी जप्त करण्यात आल्या. सबंधित भट्टी मालक व जप्त केलेल्या वाहन मालकांना फरारी घोषित करून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
फोटो ओळ - शिंदवणे व सोरतापवाडी गावच्या हद्दीत जेसीबीच्या सहाय्याने गावठी दारूभट्टया व दारू साठविण्याच्या टाक्या उध्वस्त करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी.