पुरंदरच्या नीरा येथे राज्य उत्पादन शुल्क पथकाची मोठी कारवाई ; ९१ लाखांची विदेशी दारू जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 05:21 PM2022-06-16T17:21:22+5:302022-06-16T17:21:33+5:30
नीरा (ता.पुरंदर) येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत विदेशी दारूचा मोठा मद्यसाठा जप्त केला
नीरा : नीरा (ता.पुरंदर) येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत विदेशी दारूचा मोठा मद्यसाठा जप्त केला आहे. यामध्ये ६६ लक्ष रुपयांची तस्करी करण्यात येत असलेली दारू सह एकूण ९१,७७,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दि.१५ जुन २०२२ रोजी राज्य उत्पादन शुल्क पुणे अधिक्षक यांना मिळालेल्या गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती. पुरंदर तालुक्यातील नीरा गावच्या हद्दीत नीरा - लोणंद रोडवर हॉटेल न्यू प्रसन्ना समोरील रोडवर गोवा राज्यातून विक्री असलेल्या मद्याची वाहतूक होणार असल्याचे त्यांना समजले. त्या अनुषंगाने नीरा गावच्या परिसरातील हॉटेल न्यू प्रसन्न समोरील रोडवर राज्य उत्पादन शुल्कचे भरारी पथक क्रमांक २ पुणे विभागाने सापळा लावला. खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार भारत बेंज कंपनीचा ट्रक त्यांना दिसून आला. सदर ट्रक चालकास ट्रक रोडच्या कडेला घेण्याचा इशारा केला. त्यानंतर ट्रकची तपासणी केल्यावर त्यामध्ये फक्त गोवा राज्यात विक्रीसाठी असलेला विदेशी मद्यसाठा व बिअरचा साठा मिळाला. त्यावरून ट्रक चालक प्रवीण परमेश्वर पवार (वय २३ वर्षे रा तांबोळे, ता. मोहोळ, जिल्हा सोलापूर) याला जागीच अटक करून ताब्यात घेतले आहे.