राज्य सरकारकडून दहा तीर्थक्षेत्रांना ‘ब ’दर्जा जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 05:40 PM2018-08-21T17:40:27+5:302018-08-21T17:53:37+5:30
या संदर्भातील प्रस्तावाची फाईल तीन महिन्यांपूर्वी मुंबईतील बांधकाम भवन येथे दाखल करण्यात आली होती. यापूर्वी चिंतामणी गणपती देवस्थानास तीर्थक्षेत्राचा 'क' वर्ग दर्जा प्राप्त होता.
लोणी काळभोर : महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील दहा देवस्थानांना तीर्थक्षेत्राचा 'ब' वर्ग दर्जा जाहीर झाला आहे. त्यात अष्टविनायक गणपतींपैकी एक असलेले पुणे जिल्ह्यातील थेऊर येथील श्रीक्षेत्र चिंतामणी देवस्थान व लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट आदी देवस्थानांचा समावेश करण्यात आला आहे.
या संदर्भातील प्रस्तावाची फाईल तीन महिन्यांपूर्वी मुंबईतील बांधकाम भवन येथे दाखल करण्यात आली होती. यापूर्वी चिंतामणी गणपती देवस्थानास तीर्थक्षेत्राचा 'क' वर्ग दर्जा प्राप्त होता. आता तो रद्द करून तीर्थक्षेत्राचा 'ब' वर्ग दर्जा देण्यात आला आहे. बांधकाम विभागाचे प्रधान सचिव मा.असिम गुप्ता व उपसचिव मा.मनोज जाधव यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे झालेल्या बैठकीमध्ये सदर प्रस्तावास मान्यता देण्यात आली. तीर्थक्षेत्राचा वरिष्ठ 'ब' वर्ग दर्जा प्राप्त असणाऱ्या देवस्थानांना विकासकामे करण्यासाठी राज्यसरकारकडून मोठ्या प्रमाणात भरीव निधी दिला जातो. 'ब' वर्ग दर्जा प्राप्त झाल्यामुळे श्रीक्षेत्र थेऊर गावचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन हवेली तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य हिरामण काकडे यांनी व्यक्त केले.
याकामी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी ओमप्रकाश शेटे, विधान भवनाचे उपसचिव राजेश तारवी, पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासरावजी देवकाते यांचे विशेष सहकार्य लाभले.
महाराष्ट्रातील 'ब' वर्ग दर्जा प्राप्त झालेली तीर्थक्षेत्र पुढीलप्रमाणे :
श्रीक्षेत्र चिंतामणी देवस्थान, ता. हवेली, जि. पुणे.
श्री. लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट, गोळेगांव, ता. जुन्नर, जि. पुणे.
श्री. कुलस्वामी खंडेराय देवस्थान, श्रीतीर्थक्षेत्र वडज, ता. जुन्नर, जि. पुणे.
श्री. सिद्धिविनायक गणपती मंदिर, ठेंगोडा, ता. बागलान, जि. नाशिक.
श्री. सिद्धेश्वर महादेव मंदीर, करंजगाव, ता. निफाड, जि. नाशिक.
श्री. जटाशंकर देवस्थान, मुळज, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद.
श्रीक्षेत्र जकराया मंदिर, चेबकी, ता. मोहोळ, जि. सोलापूर.
प.पू. सदगुरू चंपामाई महाराज साधक आश्रम, चाटा, ता. जि. लातूर.
श्री. राधाकृष्ण मंदिर, गातेगांव, ता. जि. लातूर.
श्री. महादेव मंदिर, निढोरी, ता. कागल, जि. कोल्हापुर.