आमदार निलंबनाचा ठराव करून लोकशाहीला फासावर लटकवण्याचं काम आघाडी सरकारने केलं! देवेंद्र फडणवीसांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 06:33 PM2021-07-09T18:33:32+5:302021-07-09T18:34:46+5:30
आम्ही जनतेत जाऊ आणि गरज पडली तर न्यायालयात देखील दाद मागण्यासाठी जाणार
पुणे : ओबीसींच्या मुद्द्यांवरून आम्ही राज्य सरकारचा भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले. मात्र, यावरूनच सत्ताधारी पक्षाची मानसिकता उघड झाली आहे. १२ आमदारांचे निलंबन म्हणजे लोकशाहीला फासावर लटकवण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे अशी खरमरीत टीका विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस हे पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, सभागृह नेते गणेश बिडकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, मी २२ वर्षांपासून सभागृहात आहे. आणि त्याचे पूर्ण भान ठेवून आणि विश्वासाने सांगतो की, भाजपच्या एकही नेत्याने सभागृहात हाणामारी किंवा शिवीगाळ केलेली नाही. हा यावेळी वाद झाले. मात्र कोणीही नेत्याने पीठासीन अधिकाऱ्याला धक्काबुक्की व मारहाण केलेली नाही. हे सर्व सत्ताधारी पक्षाचे कपोलकल्पित कुभांड आहे, असा आरोप देखील त्यांनी केला. मात्र, कितीही आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, एमपीएससी विद्यार्थी प्रश्नांवर आवाज उठवत राहणार आहोत.
... तर न्यायालयात दाद मागण्यासाठी जाणार
आताच विधानसभेचे पावसाळी अधिवेशन झाले. कट रचून आमच्या 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. ओबीसींच्या मुद्द्यावर सगळी माहिती जाहीर केल्यावर अडचणीत येत असल्याचे लक्षात येताच आमचे आमदार निलंबित केले. यावरुनच सत्ताधारी पक्षांची मानसिकता काय आहे हे लक्षात येते. मुळात, सरकारला ओबीसी आरक्षणात काहीच रस नाही. फेब्रुवारी महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तीन चतुर्थांश निवडणुका होणार आहेत. तिथपर्यंत जर ओबीसींना आरक्षण मिळाले नाही तर त्यानंतर मिळूनही पुढील सात वर्षे काही फायद्याचे ठरणार नाही. यामुळेच, सरकार फक्त चालढकलपणा करत आहे. त्यांना फेब्रुवारी 2022 पर्यंत फक्ट टाईमपास करायचा आहे. पण, ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर लढाई सुरूच राहणार असल्याचे फडणवीस म्हणाले. चुकीच्या पद्धतीने आमचे बारा आमदार निलंबित केले. त्याविरोधात आम्ही जनतेत जाऊ आणि गरज पडली तर न्यायालयात देखील दाद मागण्यासाठी जाणार असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
मुंडे भगिनींच्या नाराजीवर भाष्य करताना फडणवीस म्हणाले...
प्रितम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने पंकजा मुंडे यांची नाराजी आणि भागवत कराड यांना मिळालेले मंत्रिपद याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी आणि डॉ. भागवत कराड आम्ही दोघेही मुंडे साहेबांनी तयार केलेलं नेतृत्व आहे. याला पद दिल्याने, याला मंत्री केल्याने याला संपवायचंय वगैरे भाजपामध्ये नसतं. भागवत कराड यांना मंत्री केल्याने जेवढा आनंद मला किंवा पक्षातल्या कार्यकर्त्यांना झाला आहे. त्याच्यापेक्षा जास्त आनंद पंकजाताईंना झाला असेल. कारण भागवत कराड हे मुंडे परिवारातले आहेत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.