कलाकारांकडे फक्त ‘एंटरटेनर’ म्हणून बघू नका; अन्यथा...: राहुल देशपांडेंची राज्य सरकारविरुद्ध नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 09:04 PM2021-07-17T21:04:43+5:302021-07-17T21:06:06+5:30
राज्य सरकारने कोरोनाकाळात कलाकारांकडे लक्ष दिलं नाही : राहुल देशपांडे यांची खंत
पुणे : आम्ही फक्त ‘एंटरटेनर’ नाही. संगीत किंवा नाटक असो ते सामाजिक शांततेच्या अवस्थेपर्यंत घेऊन जाते. त्याच्याकडे तुम्ही निव्वळ मनोरंजन म्हणून बघितले तर गल्लत होईल. त्याच्याकडे केवळ मनोरंजन म्हणून न बघता समाजाची गरज म्हणून पाहिले तर कलाकार जगतील. ते जगले नाही तर समाजव्यवस्था टिकणार नाही. कोरोनाकाळात राज्य सरकारनेकलाकारांकडे लक्ष दिलेलं नाही, अशा शब्दात गायक राहुल देशपांडे यांनी राज्य सरकारविरूद्ध नाराजी व्यक्त केली. तसेच राज्य सरकारने थोडं संवेदनशील होत आमच्याकडे थोडे लक्ष देणे गरजेचं आहे, अशी विनंतीही केली आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांसह लग्न समारंभ 50 लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी देण्यात आली आहे. विविध पक्षांचे राजकीय कार्यक्रम सुरू असून, त्या कार्यक्रमांना गर्दी होत असतानाही सरकार आणि प्रशासन मौन बाळगते. इतक सगळं सुरू आहे, पण नाट्यगृह आणि चित्रपटगृह बंद आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यात एका कार्यक्रमानंतर राहुल देशपांडे आणि आनंद इंगळे यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.
सरकारने कलाकारांकडे लक्ष दिलेले नाही अशा शब्दात राहुल देशपांडे यांनी सरकारविरूद्ध नाराजी व्यक्त केली, केवळ पडयामागचे कलाकार नाहीत तर स़्टुडिओमध्ये काम करणारे आणि ऑर्केस्ट्रामध्ये गाणारे वाजवणारे कलाकार असतील. त्यांना सरकारने पैसेच द्यायला हवेत असे नाही तर किमान त्यांचा इन्शुरन्स काढावा, रूग्णालयांच्या बिलांचे पैसे असोत ते द्यावेत असे काहीतरी करायला हवे तर कलाकारांचा विश्वास बसेल. आत्ता सरकार खूप काम करतंय, लसीकरण सुरू केलंय..पण राजकीय गर्दी चालते तिथे काणाडोळा होतो मग आम्ही गायचे का नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सगळी खबरदारी घेऊन प्रेक्षक येतोय तर मग नाट्यगृह का सुरू होत नाहीत. चांगली कला, संगीत जगले तर समाज जिवंत राहातो. सरकारला आणि प्रशासनाला विनंती आहे की आमच्याकडे थोडे लक्ष द्या.
आनंद इंगळे यांनी देखील नाट्यगृह सुरू व्हायला पाहिजेत असे सांगितले. मनोरंजन ही समाजाची मोठी गरज असते. नाट्यगृह सुरू झाल्यानंतर प्रेक्षक येतील की नाही हा पुढचा प्रश्न आहे. पण आपण प्रयत्नही करायचा नाही ही गोष्ट योग्य नाही. लोकांची गेट टूगेदर चालू आहेत, इतरही कार्यक्रम चालू आहेत. हे सर्व सुरू आहे मग कला क्षेत्र का नाही? सर्व नियमांचे पालन करून आम्ही नाटक करू यासाठी नाट्यगृह सुरू करण्याची परवानगी द्या अशी आमची प्रशासनाकडे मागणी असल्याचे ते म्हणाले.
-----------------------