Pune News: पुण्यात 'गृह विलगीकरण' सुरूच राहणार: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:11 AM2021-05-26T04:11:03+5:302021-05-26T15:01:07+5:30
राज्य सरकारने १८ जिल्ह्यांमध्ये गृह विलगीकरण (होम आयसोलेशन) बंद करण्याचा निर्णय मंगळवारी (दि. २५) जाहीर केला होता
पुणे : राज्य सरकारने १८ जिल्ह्यांमध्ये गृह विलगीकरण (होम आयसोलेशन) बंद करण्याचा निर्णय मंगळवारी (दि. २५) जाहीर केला आहे. यात पुणे जिल्ह्याचाही देखील समावेश करण्यात आला होता. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयाला पुण्यातून तीव्र विरोध दर्शविण्यात आला होता. खुद्द महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा हा निर्णय अव्यवहार्य असल्याचे मत व्यक्त केले होते. परंतु, या विरोधानंतर पुण्यात गृह विलगीकरण( होम आयसोलेशन) सुरुच राहणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
होम आयसोलेशन सारासार विचार करून, फायद्या-तोट्यांचा विचार न करता हा निर्णय राज्य शासनाने लादला असल्याची भावना यामुळे पुणेकरांमध्ये निर्माण झाली होती. सरकारी कोविड केअर सेंटरमध्ये चौदा दिवस काढण्याच्या भीतीनेच आता लक्षणे असणारे पुणेकर कोरोना चाचणी करण्याचे टाळतील अशीही शक्यता व्यक्त केली जात होती.
“पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. सध्या आयसोलेशन बेडची संख्या १५ हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे संस्थात्मक विलगीकरणासाठी आवश्यक सुविधा पुरेशा उपलब्ध आहेत,” असल्याचे विभागीय कृती दलाचे अध्यक्ष डॉ. दिलीप कदम यांनी सांगितले.
हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांच्या मते, आजवर बहुतांश कोरोना रुग्ण होम आयसोलेशनमध्ये बरे झाले आहेत. जिल्ह्यात होम आयसोलेशनमधील रुग्णांचा सर्वाधिक आकडा ४३ हजार इतका होता. होम आयसोलेशन उपचार शास्त्रीय पद्धतीने ठरवण्यात आले आहेत. सध्या कोविड सेंटरमधील खाटा उपलब्ध आहेत. मात्र, रुग्णांचे ‘इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन’ केल्यास आरोग्य व्यवस्थेवरील ताण पुन्हा एकदा वाढेल. सध्या रुग्णांचा आकडा कमी होत आहे. कोरोनाव्यतिरीक्त इतर उपचारही हळूहळू सुरू होतील. अशावेळी आवश्यक मनुष्यबळ आपल्याकडे आहे का, असा विचार करावा लागेल. अर्थात, रुग्णांनी आणि नागरिकांनीही स्वयंशिस्त पाळणेही गरजेचे आहे
व्यवस्था आहे का?
होम आयसोलेशन बंद केल्यास कोविड सेंटरवरील ताण वाढेल. आपल्याकडे तेवढ्या जागा आणि मनुष्यबळ आहे का, त्यांना लागणारे पीपीई किट उपलब्ध आहेत का, याचा विचार करावा लागेल.
- डॉ. बाळासाहेब देशमुख, अध्यक्ष, आयएमए, पुणे
....म्हणून बंदी
“होम आयसोलेशनमधील रुग्णामुळे बरेचदा कुटुंबीयांना संसर्गाची शक्यता असते. अनेकदा ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण बिनधास्त घराबाहेर फिरतात. त्यामुळेही संसर्गाची शक्यता वाढते. म्हणून होम आयसोलेशनवर बंधने आणण्याचा शासनाचा विचार आहे. मात्र, होम आयसोलेशन रद्द करण्यापेक्षा रुग्ण घराबाहेर पडणार नाहीत, यासाठी स्थानिक प्रशासनाने कडक यंत्रणा राबवणे गरजेचे आहे. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांची मदत घेता येईल.”
- डॉ. मनोज देशपांडे, जनरल फिजिशियन
शासनाने याचा विचार केला का?
“होम आयसोलेशन रद्द केल्यास लोक चाचणी करण्याचे तसेच उपचार घेण्याचे टाळतील. दुसरे म्हणजे, ८० ते ८५ टक्के प्रकरणांमध्ये घरी उपचार केल्याने फायदा होत आहे. कारण लोकांना कोविड सेंटरमध्ये दाखल होण्याची भीती वाटते. कोविड सेंटरमध्ये अनेकांना एकटेपणामुळे मानसिक त्रास होतो. सरकारला गंभीर्याने परिस्थिती सुधारायची असेल तर शासकीय नियंत्रणातील खासगी रुग्णालयांचा ताबा घ्या. खासगी रुग्णालयांमध्ये कोविड उपचार मोफत करा. केरळ सरकारने हे मॉडेल चांगल्या प्रमाणात वापरलेले आहे,” अशी प्रतिक्रिया एका पुणेकराने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.
आधार घरीच मिळतो.....
“होम आयसोलेशनमध्ये रुग्ण कुटुंबाच्या डोळ्यांसमोर असतात. त्यामुळे त्यांना एकटेपणा येत नाही, आधार वाटतो. सरसकट होम आयसोलेशन बंद करण्यापेक्षा ज्यांच्या घरी दोन टॉयलेट असतील, वेगळी खोली असेल अशांनाच परवानगी द्यावी. सरसकट होम आयसोलेशन रद्द केल्यास नागरिक लक्षणे दिसली, तरी चाचणी करण्यास पुढे येणार नाहीत,” असे मत गृहिणी वंदना पटवर्धन यांनी व्यक्त केले.