भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांबाबत राज्य सरकार उदासीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:17 AM2021-02-21T04:17:49+5:302021-02-21T04:17:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांकडे राज्य सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याची तक्रार केंद्रीय विमुक्त, भटके व अर्ध ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांकडे राज्य सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याची तक्रार केंद्रीय विमुक्त, भटके व अर्ध भटके विकास व कल्याण बोर्डाचे अध्यक्ष दादा इदाते यांनी केली. याबाबत त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची मुंबईत भेट घेतली व त्यांना निवेदन दिले व यात लक्ष घालण्याची विनंती केली.
कोश्यारी यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले, निवेदन स्वीकारले व सर्व संबंधितांबरोबर याविषयी बोलण्याचे आश्वासनही दिले. इदाते यांनी त्यांना सांगितले की केंद्र सरकार या समाजघटकाच्या विकासासाठी प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रानेही यापूर्वी या विषयात देशाला दिशा देणारे निर्णय घेतले, मात्र सन २०१९ मध्ये राज्यात सत्तांतर झाले व सर्वप्रथम विमुक्त जाती भटक्या जमाती मंत्रालयाचे नाव बदलून ते बहुजन कल्याण मंत्रालय करण्यात आले. त्यातून या मंत्रालयाचे काम त्याचा पुरेसा बोध होत नाही, तसेच मागील ६० वर्षांपासून असलेली त्यांची ओळख पुसण्याचा हा प्रयत्न आहे.
महाज्योती संस्था वि.जा.भ.ज.,ओबीसी एसबीसी साठी असताना या संस्थेवर एकही प्रतिनिधी विजाभज प्रवर्गातील घेतलेला नाही. केंद्राच्या निर्देशाप्रमाणे अद्यापही भटक्या विमुक्तांचे सर्वेक्षण चालू केले नाही, याकडेही इदाते यांनी राज्यपालांचे लक्ष वेधले. केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे राज्यात जिल्हास्तरावर भटके विमुक्त समस्या निराकारण समित्या गठित स्थापन कराव्यात, समाजाचा अभ्यास करण्यासाठी राज्यातील विद्यापीठांमध्ये संशोधन केंद्र स्थापन करावे अशा मागण्यांचे निवेदन इदाते यांनी राज्यपालांना दिले. या वेळी जनजाती विकास परिषदेचे कार्यवाह अनिल फड तसेच अजित आंब्रे उपस्थित होते.