राज्य सरकारच १२ सदस्यांच्या नियुक्तीसाठी आग्रही नाही; तुम्ही का आग्रह धरता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:16 AM2021-08-17T04:16:59+5:302021-08-17T04:16:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील विधानभवन येथील मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमानंतर काँग्रेसचे नेते आमदार शरद रणपिसे यांनी राज्यपाल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यातील विधानभवन येथील मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमानंतर काँग्रेसचे नेते आमदार शरद रणपिसे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना १२ सदस्यांच्या नियुक्तीबाबत विचारणा केली. यावर राज्यपालांनी आपल्या मागे उभ्या असलेल्या अजित पवार यांच्याकडे हात करीत ते माझे मित्र आहेत. राज्य सरकार आग्रह धरत नाही. तुम्ही का धरता असे सुनावले. राज्यपालांच्या उत्तराने अजित पवार यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले.
अनेक दिवसांपासून राज्यात राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांचा विषय गाजत आहे. रविवारी (दि. १५) पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात भारताच्या स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, भाजपचे खासदार गिरीश बापट आणि काँग्रेस नेते शरद रणपिसेही उपस्थित होते. ध्वजारोहण झाल्यानंतर भगतसिंह कोश्यारी आणि त्यांच्या पाठोपाठ अजित पवार उपस्थित मान्यवरांच्या भेटीगाठी घेत असताना अचानक समोरून काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांनी राज्यपालांना १२ सदस्यांच्या नियुक्तीविषयी विचारणा केली. या प्रश्नाची अपेक्षा कदाचित राज्यपालांनी देखील केली नव्हती. मात्र, रणपिसे यांच्या प्रश्नावर राज्यपालांनीही तत्काळ उत्तर देत वेळ मारून नेली. या वेळी मागेच उभ्या असलेल्या अजित पवार यांच्याकडे हात दाखवून राज्यपाल म्हणाले, हे माझे मित्र आहेत. सरकार आग्रह धरत नाही, तर तुम्ही का धरता? राज्यपालांच्या या उत्तरावर अजित पवार यांनीही स्मितहास्य केले. राज्यपालांनी दिलेल्या उत्तरावर पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही विचारणा केली. त्यावर बोलताना, आज स्वातंत्र्य दिन आहे. या विषयावर नंतर बोलेन, एवढेच बोलून अजित पवारांनी विषय टाळला.