राज्य सरकारचे व्यवस्थेकडे दुर्लक्ष; पोलिसांची सुरक्षा धोक्यात आल्याने चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 07:03 PM2021-02-01T19:03:04+5:302021-02-01T19:03:40+5:30
पोलिसांवरील हल्ले सहन करणार नाही
पिंपरी : जे पोलीस आपली काळजी घेतात त्यांचीच सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. पोलिसांवरील हल्ले लज्जास्पद बाब असून ही शोभा देणारी गोष्ट नाही. यापुढे पोलिसांवरील हल्ले सहन करणार नाही, असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाचे पोलीस शिपाई रवींद्र करवंदे हे वाहतूक नियमन करीत असताना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. त्यात करवंदे गंभीर जखमी झाले. त्यामुळे करवंदे यांची दरेकर यांनी सोमवारी कासारवाडी येथे खासगी रुग्णालयात भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
प्रवीण दरेकर म्हणाले, जखमी पोलीस करवंदे यांच्या तब्बेतीची चाैकशी केली. त्यांची प्रकृती आता चांगली असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. राज्यात पोलिसांवर हल्ले होत आहेत. असा एक दिवस नाही की राज्यात पोलिसांवर हल्ला झाला नाही. पोलिसांच्याच सुरक्षेची चिंता असेल तर त्यांची सुरक्षा करा, अशी कोणाकडे मागणी करायची? ही सरकारची जबाबदारी आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत राज्य सरकारने व्यवस्थेवर नीट लक्ष ठेवत समाजातील अशा प्रवृत्तीच्या लोकांची पुन्हा अशी हिम्मत होणार नाही, यासाठी ही प्रवृत्ती मुळासकट ठेचली पाहिजे. पूर्वी हाफ पॅन्टवरील पोलीस एक दंडुका घेऊन आले तरी गाव शांत व्हायचं. आज ते कमी होताना दिसतंय. सरकारचे, प्रशासनाचे, व्यवस्थेकडे लक्ष नाही. त्यांनी लक्ष द्यावे.
‘प्रभुणे यांचा सन्मान राखला जाईल’
पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले चिंचवड येथील गिरीश प्रभुणे यांच्या संस्थेला महापालिकेने नोटीस बजावली आहे. मिळकत कर थकविल्याप्रकरणी ही नोटीस आहे. मात्र नोटिशीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली. त्याबाबत दरेकर म्हणाले, सत्तेत असलेले महापाैर, सभागृह नेता किंवा स्थायी समितीचा अध्यक्ष नोटीस पाठवित नाहीत. प्रशासन किंवा संबंधित विभागाकडून नोटीस बजावली जाते. त्यांच्याशी सत्ताधाऱ्यांचा संबंध नसतो. तरीही पुरस्कारप्राप्त व्यक्तींना नोटीस पाठविली असेल तर महापालिकेतील भाजपचे पदाधिकारी याची दखल घेतील. नोटीस का पाठविली याची विचारणा करून पुरस्कार्थींचा सन्मान राखला जाईल.