'राज्याचे प्रश्न कोमात, स्वबळाची छमछम जोरात' आशिष शेलार यांची आघाडीवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 07:52 PM2021-07-21T19:52:58+5:302021-07-21T19:59:59+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पिंपरी-चिंचवडमधील संघटनात्मक आढावा घेतला

state government not handle a manegement - Ashish Shelar | 'राज्याचे प्रश्न कोमात, स्वबळाची छमछम जोरात' आशिष शेलार यांची आघाडीवर टीका

'राज्याचे प्रश्न कोमात, स्वबळाची छमछम जोरात' आशिष शेलार यांची आघाडीवर टीका

googlenewsNext
ठळक मुद्देमहाविकास आघाडीचे सरकार टिकणार की नाही? हे जनता ठरविणार शिवसेनेने ब्लॅकमेलिंगचे धंदे आधी बंद करा जनतेच्या प्रश्नांवर सरकार बेफिकीर

पिंपरी : राज्याचे प्रश्न कोमात, स्वबळाची छमछम जोरात, असे राज्याच्या परिस्थितीचे वर्णन करता येईल. आघाडीचा कोणताही नेता सकाळी उठतो आणि स्वबळाची भाषा बोलतो. दुसरा त्यावर अग्रलेख लिहतो आणि तिसरा दिल्लीत जातो. प्रश्नांची सोडवणूक करण्याऐवजी प्रत्येक नेता १०८ वेळा स्वबळाचा मंत्र जपतात, अशी टीका भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी केली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील संघटनात्मक आढावा घेतला. प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पक्षाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, महिला प्रदेशाध्यक्ष उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, महापौर उषा ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे आदी उपस्थित होते.

शेलार म्हणाले, ‘‘सध्याची स्थिती आणि त्यावर मार्ग काढणे याचे प्रमाण व्यस्त आहे. राज्याचे प्रश्न कोमात असून, स्वबळाची छमछम मात्र जोरात आहे. महाविकास आघाडीचे सरकार टिकणार की नाही? याच्याशी आमचा संबंध नाही. ते जनता ठरविणार आहे. मात्र, जनतेच्या प्रश्नांवर सरकार बेफिकीर आहे. पोलिसांकडून तर केवळ वसुलीचे काम केले जात आहे. त्यामुळे जनतेमध्ये नाराजी आहे.’’

बेडूक बैल होत नाही

पिंपरी-चिंचवड पालिकेत शिवसेनेचे ५० नगरसेवक निवडून येतील. आणि महापौरही आमचाच होईल, या खासदार राऊत यांच्या वक्तव्यावर शेलार म्हणाले, ‘‘बेडकाने कितीही फुगण्याचा प्रयत्न केला तरी तो बैल होत नाही. शिवसेनेने ब्लॅकमेलिंगचे धंदे आधी बंद करावेत. 

 भूखंडाचे श्रीखंड भाग दोन

‘‘राज्यातील महाविकास आघाडीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) स्थापन करून भूखंडाचे श्रीखंड भाग-२ राबविण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. नवनगर विकास प्राधिकरणाचे कोट्यवधी रुपयांचे भूखंड घेऊन या समितीवर भाजपचा एकही आमदार नाही, याबद्दल आश्चर्य वाटते. येथून आता मलई लाटण्याचा धंदा चालू होईल.’’ असाही आरोप त्यांनी यावेळी केला आहे. 

राज्यातील प्रश्नावर लक्ष

शेतकऱ्यांना बोगस बियाणे, कर्जमुक्तीची घोषणा कागदावर, वादळग्रस्तांना नुकसानभरपाई नाही,  महिलांवरील अत्याचारात वाढ, सायबर क्राईममध्ये सतत वाढ, बलुतेदारांना आर्थिक मदत नाही, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारचा नाकर्तेपणा आहे, अशी टीका शेलार यांनी केली.

Web Title: state government not handle a manegement - Ashish Shelar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.