शिल्लक ‘आनंद’ जो घेईल त्याला, आनंदाचा शिधा वितरणाबाबत राज्य सरकारचे आदेश
By नितीन चौधरी | Published: October 12, 2023 03:20 PM2023-10-12T15:20:05+5:302023-10-12T15:20:53+5:30
गणेशोत्सवानिमित्त राज्यात १९ सप्टेंबरपासून हा आनंदाचा शिधा वितरित करण्यात आला
पुणे : गणेशोत्सवात रेशन दुकानांमध्ये साखर, चणाडाळ, रवा व पामतेल या चार वस्तू शंभर रुपयात वितरित करण्यात आल्या. सामान्यांचा सण गोड व्हावा या उद्देशाने हा आनंदाचा शिधा आता दिवाळीतही वितरित करण्यात येणार आहे. गणेशोत्सवातील आनंदाचा शिधा दहा ऑक्टोबरपर्यंत वितरित करण्याची मुदत सर्व जिल्ह्यांमध्ये देण्यात आली होती. मात्र राज्यात आतापर्यंत ९५ टक्के वितरण झाले असल्याने शिल्लक राहिलेला आनंदाचा शिधा ‘जो घेईल त्याला द्यावा,’ असे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. यापूर्वी घेतला असला तरी त्याला आता हा आनंदाचा शिधा आता घेता येणार आहे.
गणेशोत्सवानिमित्त राज्यात १९ सप्टेंबरपासून हा आनंदाचा शिधा वितरित करण्यात आला. त्याला १० ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. या काळामध्ये राज्यात ९५.४७ टक्के वितरण झाले आहे. तर अजुनही ४.५ टक्के आनंदाचा शिधा शिल्लक आहे. हा शिल्लक राहिलेला आनंदाचा शिधा खराब होऊ नये, यासाठी राज्य सरकारने प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य अर्थात जो येईल त्याला विक्री करण्याचे आदेश सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी व अन्नधान्य वितरण अधिकारी यांना दिले आहेत. त्यामुळे पूर्वी आनंदाचा शिधा घेतलेल्यांनाही पुन्हा शंभर रुपयांमध्ये या चार वस्तू घेता येणार आहेत.
सर्वाधिक वितरण साताऱ्यात
दरम्यान राज्यात सर्वाधिक ९९.८१ टक्के आनंदाचा शिधाचे वितरण सातारा जिल्ह्यात झाले आहे. त्या खालोखाल कोल्हापूरमध्ये ९९.६७ तर सोलापूरमध्ये ९९.३५ टक्के वितरण झाले आहे. गोंदिया आणि सांगली जिल्ह्यातही ९९ टक्क्यांच्यावर वितरण झाले आहे. तर सर्वात कमी ८७.२० टक्के वितरण रायगड जिल्ह्यात झाले आहे. मुंबईतील वडाळ्यात ८९.३३ तर अकोला जिल्ह्यात ८९.८८ टक्के वितरण झाले आहे.
विभागात पुणे शहर तळात
पुणे विभागातील पाच जिल्हे तसेच पुणे व सोलापूर अन्नधान्य वितरण कार्यालयामार्फत आतापर्यंत एकूण ९८.२९ टक्के आनंदाचा शिधा वितरित करण्यात आला आहे. पुणे विभागात शिधापत्रिकाधारकांची संख्या २७ लाख १७ हजार ५८२ असून आतापर्यंत २६ लाख ७१ हजार १४० जणांनी आनंदाचा शिधा घेतला आहे. तर ४६ हजार ४४२ जणांनी अजून त्याचा लाभ घेतला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे विभागात सर्वात कमी ९३.७४ टक्के वितरण पुणे शहर अन्नधान्य वितरण कार्यालयामध्ये झाले आहे. पुण्यात अजूनही सुमारे २० हजार ६८ जणांनी आनंदाचा शिधा घेतल्या घेतलेला नाही. सोलापूर जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत आतापर्यंत ९७.२८ टक्के इतकेच वितरण झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात अजूनही १० हजार ४०८ जणांनी याचा लाभ घेतलेला नाही. तर पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या मार्फत आतापर्यंत ९८.४५ वितरण झाले असून जिल्ह्यातही ८ हजार ७१३ शिधापत्रिकाधारकांनी याची खरेदी केलेली नाही.