शेतकऱ्यांची वीज बंद करण्याला राज्य शासन जबाबदार; विज पुर्ववत न केल्यास 'रास्ता रोको' करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 04:09 PM2021-11-23T16:09:39+5:302021-11-23T16:09:47+5:30
गावामध्ये झालेल्या बैठकीत राज्यशासन व प्रशासनाचा निषेध व्यक्त केला असून आठ तासात कृषी पंपाची वीज जोडणी पुर्ववत न केल्यास तालुका लोकप्रतिनिधींना याची मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा कर्मयोगी साखर कारखान्याचे माजी संचालक बाबामहाराज खारतोडे यांनी दिला आहे.
कळस : शेतक-यांनी शेती पंपाची वीज खंडित केल्यामुळे महावितरण कंपनीच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. गावामध्ये झालेल्या बैठकीत राज्यशासन व प्रशासनाचा निषेध व्यक्त केला असून आठ तासात कृषी पंपाची वीज जोडणी पुर्ववत न केल्यास तालुका लोकप्रतिनिधींना याची मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा कर्मयोगी साखर कारखान्याचे माजी संचालक बाबामहाराज खारतोडे यांनी दिला आहे.
कळस ता.इंदापुर येथील दत्त मंदिरात आयोजित केलेल्या निषेध सभेत ते बोलत होते. या वेळी कर्मयोगी साखर कारखाण्याचे संचालक निवृत्ती गायकवाड, विजय खर्चे, रमेश खारतोडे, दादा वायाळ,धनंजय खारतोडे, सिताराम खारतोडे, पोपट सांगळे, सतीश ओमासे, विलास खारतोडे उपस्थित होते.
खारतोडे म्हणाले, महावितरण कंपनीने दर तीन महिन्याला शेतकऱ्यांची वीज बंद करून त्यांचे नुकसान होण्याला राज्य शासन जबाबदार आहे. तालुक्याच्या लोकप्रतिनिधीनी कळस गावातील वीज आठ तासात वीज पुरवठा पुर्ववत करून द्यावा. अन्यथा या गावात त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा दिला. शेती मालाला नसलेले बाजार भाव उत्पादन खर्चात झालेली वाढ या मुळे शेती व्यवस्था कोलमडलेली आहे. त्यामध्ये महावितरण कंपनीने विज पुरवठा खंडित केल्याने पिके गेली आहेत. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी या वेळी करण्यात आली.
या वेळी प्रशासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या या बाबत महावितरण कार्यालयात निवेदन देण्यात आले असून विज पुरवठा सुरळीत न झाल्यास कळस येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.