मुद्रांक शुल्कापोटीचे २३७ कोटी रुपये राज्य शासनाने त्वरित द्यावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:11 AM2021-05-24T04:11:21+5:302021-05-24T04:11:21+5:30
पुणे : कोरोना आपत्ती निवारणासाठी महापालिकेला सध्या मोठा खर्च करावा लागत आहे़ अशावेळी राज्य शासनाने पुणे महापालिकेचे गेल्या दोन ...
पुणे : कोरोना आपत्ती निवारणासाठी महापालिकेला सध्या मोठा खर्च करावा लागत आहे़ अशावेळी राज्य शासनाने पुणे महापालिकेचे गेल्या दोन वर्षांपासून न दिलेल्या मुद्रांक शुल्कापोटीचे २३७ कोटी रुपये तत्काळ द्यावेत़, अशी मागणी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे़
रासने म्हणाले की, एलबीटी (स्थानिक संस्था कर) रद्द केल्यानंतर राज्य शासनाने महापालिकांना या नुकसानभरपाईपोटी मुद्रांक शुल्कांवर एक टक्के अधिभार लावला आहे़ हा अधिभार लावलेला निधी राज्य शासनाकडून महापालिकांना अनुदान स्वरूपात दिला जातो़ मात्र, गेल्या ऑक्टोबर, २०१९ ते मार्च, २०२० या कालावधीतील १७६ कोटी ८१ लाख रुपये, एप्रिल, २०२० ते जून, २०२० या कालावधीतील १९ कोटी ४७ लाख रुपये व जुलै ते सप्टेंबर, २०२० या कालावधीतील ४१ कोटी ३१ लाख रुपये असा मिळून २३७ कोटी रुपये इतका मुद्रांक शुल्कापोटी रुपयांपोटींचा निधी शासनाने थकविला आहे़
महापालिकेला कोरोना आपत्तीशी सामना करताना अनेक मोठ्या खर्चांना सामोरे जावे लागत आहे़ तसेच, अन्य विकासकामांनाही महापालिकेला निधीची गरज आहे़ त्यामुळे राज्य शासनाने हा थकीत निधी तातडीने महापालिकेला द्यावा, अशी मागणी रासने यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे़
--------------