राज्य सरकारचा मद्य विक्रीचा निर्णय सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 11:00 PM2020-05-05T23:00:00+5:302020-05-05T23:00:02+5:30
राज्यात लॉकडाऊनमध्ये राज्य शासनाने दारू विक्रीचा निर्णय घेतला आहे.
योगेश्वर माडगूळकर-
पिंंपरी : दारुड्यांना दारुडे म्हणू नका, ते अर्थव्यवस्थेचे कणा आहेत. ‘जर दिसला कोठे लोळताना अर्थव्यवस्थेचा कणा, जबाबदारी ती तुमची त्याला सुखरूप घरी आणा!’ यासारख्या अनेक चारोळीने शासनाचा दारूविक्रीचा निर्णय सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.
राज्यात लॉकडाऊनमध्ये राज्य शासनाने दारू विक्रीचा निर्णय घेतला आहे. त्यावर सोशल मीडियावर खुमासदार चर्चा सुरू आहे. अनेक जणांनी कवितांच्या पंक्ती, विडंबनातून सोशल मीडियावर चर्चा सुरू केली आहे. यापुढे दारू पित बसला असाल, त्या वेळी बायकोचा फोन आला, तर तिला सांगा आपण राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या मीटिंगमध्ये आहोत, असा संदेशही फिरत आहे. दारूच्या मोठ्या बाटलीला खंबा का म्हणतात, हे मला आज कळाले.
काही जणांनी हा निर्णयाचा मराठीतील न आणि ण मधील फरक पटवून देण्याचा प्रयत्न केल आहे. मराठी भाषेत न आणि ण अक्षराला किती महत्त्व आहे बघा.....
निरोप मिळाला होता आपल्याला
कोरोनाचा दारु''ण ''पराभव करायचा.... काही मंडळींनी त्याचा अर्थ दारू ''नं ''पराभव करायचा असा घेतला आहे... असे खुमासदार जोकही सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत.
देशाच्या अर्थव्यवस्थेचे खांब म्हणून त्याला आपण खंबा म्हणतो, अशी टरही उडविली जात आहे. डोळे पुसून बस बये, डोळे पुसून बस, सरकाराकडून तेल आले, बिस्कूट आले, समधं समधं आलं, त्याबरोबर नवऱ्यासाठी दारू खुली करून रडणं पण दिल, अशी उपहासत्मक टीकाही केली जात आहे.
सुरक्षित अंतर ठेवूनच रांग लावायची... पेग भरताना जशा आपण कट टू कट लाईन चेक करतो, ती आपली शिस्त इथेही दिसली पाहिजे. आणलेला माल नीट सॅनिटाईज करून मगच घरात घ्यावा. कित्येक दिवसांनी माल हातात आलाय म्हणून बाटली उलटवायची नाही. बेताने ग्लास भरावेत लॉगडाऊन किती वाढेल याचा नेम नाही.पहिल्यांदा शासनाचे जाहीर आभार मानावेत आणि मगच मुख्य कार्यक्रमाला सुरवात करावी, अशी खुमासदार टिप्पणी सोशल मीडियावर सुरू आहे.