राज्य सरकारचा ज्ञानोबा - तुकाराम पुरस्कार किसन म़हाराज साखरे यांना जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 08:00 PM2018-07-23T20:00:26+5:302018-07-23T20:04:18+5:30
डॉ.किसन महाराज साखरे हे संत वाड्.मयावर अध्यापन करत असून गेल्या ५७ वर्षांपासून अनेक मासिकांमधून तसेच वृत्तपत्रांमधून उपनिषदांपासू ते संत वाड्.मयावर लेखन करत आहेत.
पुणे: राज्य शासनाच्या वतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा सन २०१८-१९ वर्षीचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार हा डॉ.किसन महाराज साखरे यांना घोषित करण्यात आला.
संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्य करणा-या महनीय व्यक्तीला राज्य शासनाच्यावतीने प्रतिवर्षी ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. रुपये ५ लाख रोख, मानपत्र तसेच मानचिन्ह असे पुरस्कारांचे स्वरुप असून आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली. यापूर्वी ज्येष्ठ साहित्यिक रा. चिं. ढेरे, डॉ. यु. म. पठाण, प्रा. रामदास डांगे, फादर फ्रान्सिस दिब्रेटो, डॉ.उषा देशमुख, ह.भ.प निवृत्ती महाराज वक्ते यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्काराच्या निवडीसाठी तावडे यांच्या अध्यक्षतेखालील चैतन्य महाराज देगलूरकर, डॉ.प्रशांत सुरु, डॉ.सिसिलिया काव्हार्लो, भास्करराव आव्हाड आणि सय्यदभाई आदी सदस्यांच्या समितीने काम पाहिले.
डॉ.किसन महाराज साखरे हे संत वाड्.मयावर अध्यापन करत असून गेल्या ५७ वर्षांपासून अनेक मासिकांमधून तसेच वृत्तपत्रांमधून उपनिषदांपासू ते संत वाड्.मयावर लेखन करत आहेत. संत ज्ञानदेव अध्यासन समितीचे अध्यक्ष व त्या समितीव्दारे त्यांनी पुणे विद्यापीठामध्ये ज्ञानदेव अध्यासनाची निर्मिती केलेली आहे. आकाशवाणीवर त्यांनी किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे देखील कार्य केलेले आहे. ज्ञानेश्वरीच्या वेदनिष्ठा,सो्हम योग,योगत्रयी प्रवचनमालांवर त्यांनी 100 हून अधिक ग्रंथांचे संपादन केलेले आहे. १९९० साली त्यांनी संपूर्ण ज्ञानेश्वरी पावणेतीन क्विंटल ताम्रपटावर कोरुन एक चिरंजीव प्रकल्प पूर्ण केलेला आहे. संत साहित्यातील योगदानाबद्दल त्यांना टिळक विद्यापीठाकडून डी.लीट पदवी प्रदान करण्यात आली आहे. विविध सामाजिक,सांस्कृतिक तसेच वारकरी सांप्रदायिक संस्थांनी त्यांच्या कार्याची नोंद घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे. साखरे यांना हा पुरस्कार लवकरच प्रदान करण्यात येणार असल्याचे तावडे यांनी सांगितले.